वडाला फेऱ्या नव्हे, नात्याला आधार हवा; वटसावित्रीच्या निमित्ताने वास्तवाचे विश्लेषण

सात जन्मांपेक्षा हा जन्म जपा; वटसावित्रीच्या निमित्ताने वैवाहिक नात्याचा वेध
(वटसावित्री विशेष) अरुणा दत्तात्रय खंडागळे
सात जन्म दुरचं, हा जन्म तरी सांभाळा…!
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
अरुणा दत्तात्रय खंडागळे
चिखली तालुका प्रतिनिधी
ज्येष्ठ पौर्णिमेला साजरा होणारा वटसावित्री व्रत हा भारतीय संस्कृतीतील अखंड सौभाग्याचे प्रतीक मानला जाणारा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी विवाहित महिला वटवृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी त्याच जोडीदाराची प्राप्ती व्हावी, अशी प्रार्थना करतात.
परंतु पूजा आटोपल्यानंतर महिलांमध्ये रंगलेल्या गप्पांमध्ये अनेकदा नवऱ्यांच्या स्वभावाबद्दलच्या तक्रारी, नाराजी आणि वैवाहिक आयुष्यातील मतभेद ऐकायला मिळतात. यामुळे एक प्रश्न सहज पडतो—जर त्याच जोडीदाराची सात जन्मांची इच्छा व्यक्त केली जाते, तर दैनंदिन आयुष्यात एवढा दुरावा का?
वैवाहिक जीवनात मतभेद असणे ही स्वाभाविक बाब आहे. दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या, विचारांच्या व्यक्ती एकत्र राहत असताना वाद होणारच. मात्र नात्याचा पाया प्रेम, विश्वास, समजूतदारपणा आणि परस्पर आदरावर उभा असेल तर हे मतभेद नातं अधिक मजबूत करतात.
सावित्री–सत्यवानाच्या कथेतून नुसत्या पतीभक्तीचा नव्हे, तर धैर्य, बुद्धिमत्ता, निष्ठा आणि संकटातही नातं टिकवण्याचा संदेश मिळतो. त्यामुळे या व्रताचा अर्थ केवळ धार्मिक विधींमध्ये न शोधता, नात्यांमध्ये जपल्या जाणाऱ्या भावनिक बंधांमध्ये शोधणे अधिक महत्त्वाचे ठरते.
आजच्या काळात स्त्री-पुरुष समानतेच्या संकल्पनेत संसार म्हणजे केवळ जबाबदाऱ्या पार पाडणे नसून, एकमेकांच्या भावना समजून घेणे, उणिवा स्वीकारणे आणि सुख-दुःखात साथ देणे हेच खरे वैवाहिक जीवन आहे. नवरा-बायकोचे भांडण हे आळ्यावरच्या पाण्यासारखे असावे—क्षणिक आणि मनात न राहणारे. तिसऱ्याला मध्ये आणण्यापेक्षा संवादातून मतभेद मिटवणे अधिक योग्य ठरते.
‘सात जन्मांचा’ विचार करण्यापेक्षा हा एक जन्म प्रेमाने, विश्वासाने आणि गुण्यागोविंदाने जगता आला, तर तेच खऱ्या अर्थाने वटसावित्री व्रताचे यश ठरेल. वैवाहिक नात्यातील सन्मान, समजूतदारपणा आणि सहजीवनाची भावना जपणे, हाच या सणाचा आधुनिक काळातील खरा संदेश म्हणावा लागेल.



