बौद्ध विहारातील समस्या तात्काळ सोडवा; अन्यथा उपोषणाचा इशारा….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- ३ जून २०२६
वानखेड येथील बौद्ध विहार परिसरात अनेक मूलभूत समस्या निर्माण झाल्याने बौद्ध पंचमंडळ वानखेड, जय मिलिंद क्रीडा मंडळ आणि सावित्रीबाई फुले क्रीडा मंडळ यांच्या वतीने ग्रामपंचायतीकडे तात्काळ उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायत सरपंच यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बौद्ध विहारामध्ये सध्या विजेची गंभीर समस्या असून विद्युत व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तसेच विहार परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचली असून स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. विहारासमोरील नाल्या तुंबल्यामुळे सांडपाणी साचत असून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे डास, माश्या व विविध जंतूंचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याशिवाय विहारामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने भाविक व नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाल्यांमध्ये अडकलेला कचरा तातडीने हटवून परिसराची स्वच्छता करण्यात यावी, तसेच वीज व पाणीपुरवठ्याच्या समस्या कायमस्वरूपी सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
बौद्ध पंचमंडळाचे कपिल साहेबराव पहुरकर यांनी दिलेल्या निवेदनात, ग्रामपंचायतीने या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अन्यथा जय मिलिंद क्रीडा मंडळ व सावित्रीबाई फुले क्रीडा मंडळाच्या वतीने उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावेळी वैभव इंगळे, अविनाश घाटे, ऋतिक भारसाकडे, विकी इंगळे, राहुल इंगळे, भास्कर इंगळे, संतोष इंगळे, सुनील इंगळे, सचिन तायडे व जानराव चंदनशिव यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्थानिक नागरिकांनीही बौद्ध विहार परिसरातील समस्या लवकरात लवकर सोडवून परिसर स्वच्छ, सुरक्षित व सुविधायुक्त करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली आहे.



