बांभोरी पुलाजवळ पुराच्या पाण्यात बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला; अग्निशमन दलाची तीन तासांची शोधमोहीम

धोकादायक प्रवाहात जवानांचे शर्थीचे प्रयत्न; रवींद्र बोरसे यांनी खोल पाण्यातून मृतदेह बाहेर काढलाजळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I बांभोरी पुलावरून नदीच्या पुराच्या पाण्यात उडी घेतल्यानंतर बेपत्ता झालेल्या ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह अखेर तीन तासांच्या शोधमोहीमेनंतर बाहेर काढण्यात आला. पुराचा वेग, नदीपात्रातील वाढलेली पाणीपातळी आणि पुलाच्या पिलरजवळील खोल व धोकादायक प्रवाहामुळे बचाव पथकासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. या परिस्थितीत अग्निशमन दलाचे जवान रवींद्र बोरसे यांनी धाडसाने पाण्यात उतरून मृतदेह बाहेर काढला.मृत महिलेचे नाव जयश्री प्रकाश चौधरी (वय ३५, रा. भिकमचंद नगर) असे आहे. गुरुवारी, दि. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास त्यांनी बांभोरी पुलावरून नदीपात्रात उडी घेतल्याची माहिती समोर आली.घटनेची माहिती मिळताच बांभोरी परिसरातील काही पोहणाऱ्यांनी तत्काळ नदीत उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधार, पुराच्या पाण्याचा वेग आणि नदीपात्रातील धोकादायक परिस्थितीमुळे शोधमोहीमेत अडथळे निर्माण झाले. रात्रभर प्रयत्न करूनही महिलेचा ठावठिकाणा लागला नाही.सकाळी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपमहापौर मनोज चौधरी यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक बचाव साहित्य घेऊन बांभोरी पुलावर दाखल झाले. जवानांनी लाईफ गार्ड, लाईफ रिंग आणि बिलायती हुकच्या मदतीने नदीपात्रात शोध सुरू केला.सकाळी सुमारे ९.३० वाजता सुरू झालेल्या शोधमोहीमेदरम्यान जवानांनी पुलाच्या पिलरजवळील परिसर तपासला. या भागात पाण्याची खोली १५ फुटांहून अधिक असल्याने आणि प्रवाह वेगवान असल्याने शोध घेणे कठीण जात होते. अखेर सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी ११.१० वाजता जवान रवींद्र बोरसे यांना खोल पाण्यात मृतदेह असल्याचे जाणवले.त्यानंतर त्यांनी बिलायती हुकच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. प्रवाहाचा जोर असतानाही त्यांनी प्रयत्न सुरू ठेवत मृतदेह पाण्याबाहेर आणला. मृतदेह बाहेर काढण्यात यश आल्यानंतर घटनास्थळी उपस्थितांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक केले.या शोधमोहीमेत वाहनचालक देविदास सुरवाडे, प्रदीप धनगर, सौरभ चिकटे, सत्तार तडवी आणि चिराग वाघ यांनी सहकार्य केले. तसेच वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पथकातील गणेश सपकाळे, रवी भोई, नीलेश कोळी, दिनेश सपकाळे, योगेश गालफाडे आणि हेमराज सपकाळे यांनीही शोधकार्यात सहभाग घेतला.मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर जयश्री चौधरी यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे भिकमचंद नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



