कार्यालयीन वेळेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शासकीय वाहनातून गणेश विसर्जन?; माहिती अधिकार कार्यकर्त्याचा दावा

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शासकीय वाहनाचा कार्यालयीन वेळेत गणेश विसर्जनासाठी वापर झाल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केला आहे. संबंधित वाहनावर पुढील बाजूस क्रमांकपट्टी नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले असून, काही अधिकारी-कर्मचारी विना गणवेश या वाहनातून गणेश विसर्जनासाठी जात असल्याची चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित केली आहे.
गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी संबंधित शासकीय वाहनाची चित्रफीत तयार करून वाहन कुठे जात आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी ‘गणेश विसर्जनाला चाललो आहोत’, असे उत्तर मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. गणेशोत्सव किंवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, कार्यालयीन वेळेत शासकीय वाहनाचा धार्मिक कार्यक्रमासाठी वापर झाला असल्यास त्याची नियमांनुसार चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये जिल्हाभरातून नागरिक विविध कामांसाठी येत असतात. दाखले, परवानग्या, अर्ज तसेच अन्य प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना अधिकारी-कर्मचाऱ्यांची भेट घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना गणेश विसर्जनासाठी अधिकृत परवानगी देण्यात आली होती का, तसेच त्या कालावधीतील कार्यालयीन उपस्थितीची नोंद कशी करण्यात आली, याबाबतही स्पष्टता आवश्यक असल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे.
शासकीय वाहनाचा वापर कोणत्या कारणासाठी करण्यात आला, त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी होती का, तसेच वाहनाच्या पुढील क्रमांकपट्टीबाबतची स्थिती काय आहे, याची अधिकृत कागदपत्रांच्या आधारे पडताळणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. जळगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता, त्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या शासकीय वाहनातून गणेश विसर्जनासंदर्भात गुप्ता यांनी प्रसारित केलेल्या चित्रफितीबाबतची वस्तुस्थिती तपासून सांगण्याची भूमिका घेतल्याचे वृत्त आहे.
शासकीय वाहनाचा वापर, कार्यालयीन वेळेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि संबंधित परवानग्या यांची विभागीय पातळीवर पडताळणी झाल्यानंतरच या प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.



