चिखली – खामगाव मार्गावर बस-टिप्परची भीषण धडक; टिप्पर चालकाचा जागीच मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी-संजय खेडेकर
चिखली :- चिखली-खामगाव मार्गावरील बोरगाव वसू फाट्यानजीक बस आणि समोरून येणाऱ्या टिप्परची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघाताची तीव्रता एवढी होती की, एमएच २८ एबी ८२२८ क्रमांकाच्या टिप्परच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला असून, वाहनाचा पुढील भाग मधोमध चिरल्या गेले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भीषण धडकेत टिप्पर चालक सचिन वाघ, रा. संभाजीनगर, चिखली, हा चक्काचूर झालेल्या केबिनमध्ये अडकला. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली असून, मदतीसाठी धावपळ सुरू झाली.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर – देऊळगाव राजा -जालना – चिखली – खामगाव – अकोला या मार्गावर धावणाऱ्या MH 14 MT 9938 या बसचा अपघातात सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे. बसचे चालक बाळू खेडकर, संभाजीनगर आगार, असल्याचे सांगण्यात आले आहे. टिप्परचे मालक बाळू जाधव, रा. हातणी, अशी माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच ‘हॅलो बुलढाणा’चे चिखली प्रतिनिधी सय्यद साहिल यांनी घटनास्थळी धाव घेत माणुसकीच्या नात्याने मदतकार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांसह पोलीस व आपत्कालीन यंत्रणांकडून मदतकार्य सुरू करण्यात आले. या दुर्घटनेत बसमधील प्रवासी तसेच इतर जखमींची संख्या किती आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा आणि पुढील कार्यवाही सुरू आहे.
अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, टिप्पर आणि बसची धडक कशी झाली, तसेच मृत आणि जखमींची अधिकृत संख्या याबाबत पोलीस व प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या भीषण अपघातामुळे चिखली-खामगाव मार्गावरील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वृत्त लिही पर्यंत जखमींची नावे हाती आली नव्हती. अधिकृत माहिती प्राप्त होताच प्रसारित करण्यात येणार आहे.



