महाराष्ट्रमुक्ताईनगर

पुढील शैक्षणिक वर्षापासून मुक्ताईनगर शासकीय तंत्रनिकेतन सुरू होणार; आमदार एकनाथराव खडसेंच्या पाठपुराव्याला यश

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

मुक्ताईनगर येथील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मंजूर असलेल्या नवीन शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) संस्थेची प्रतीक्षा आता संपणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून ही संस्था प्रत्यक्ष सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली गतिमान झाल्या असून, विधान परिषद आमदार श्री. एकनाथराव खडसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

उपमुख्यमंत्र्यांकडून पत्राद्वारे स्पष्टोक्ती
आमदार एकनाथराव खडसे यांनी ७ मार्च २०२५ रोजी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक मंत्री ना. श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांनी लेखी पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, संस्थेचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू व्हावेत या दृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बांधकाम आणि फर्निचरच्या कामाला गती
सध्या मुख्य इमारतीचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित २० टक्के काम प्रगतीपथावर आहे. तसेच, अंतर्गत फर्निचर, विद्युत पुरवठा आणि पाणीपुरवठा यांसारखी अत्यावश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे मार्ग मोकळा
इमारतीच्या एका भागाच्या बांधकामात रस्त्याचा तांत्रिक अडथळा येत होता. मात्र, आमदार खडसे यांच्या पुढाकारानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी स्वतःहून आपली जमीन बक्षीस पत्राद्वारे हस्तांतरित केली आहे. यामुळे बांधकामातील सर्व अडथळे दूर झाले असून कामाचा वेग वाढला आहे.

पुढील शैक्षणिक सत्रात ही संस्था सुरू होणार असल्यामुळे मुक्ताईनगरसह जिल्ह्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षणाचा प्रश्न सुटणार आहे. एकनाथराव खडसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे शैक्षणिक स्वप्न आता साकार होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button