विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमली अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूल!

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुका : प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
अभियांत्रिकी महाविद्यालयापासून मुंगसाजी महाराज मंदिरापर्यंत पायी वारी; आषाढी एकादशी सोहळा उत्साहात संपन्न
चिखली, दि. २६ जुलै :
स्थानिक अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त भक्तिमय वातावरणात पायी वारी व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. अनुराधा अभियांत्रिकी
महाविद्यालयापासून मुंगसाजी महाराज मंदिरापर्यंत विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांच्या सहभागातून पायी दिंडी काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि अभंगांच्या सुरावटीत ही वारी पार पडली. वारीचे उद्घाटन अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय नन्हई सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अनुराधा प्री-प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. जया नन्हई मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
मुंगसाजी महाराज मंदिर परिसरात विद्यार्थ्यांनी ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’ आणि ‘या पंढरपुरात वाजत गाजत’ या भक्तिगीतांवर मनमोहक सादरीकरण करून प्रत्यक्ष पंढरीच्या वारीचा अनुभव उपस्थितांना दिला. संगीत शिक्षक श्री. सागर सर यांनी ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग, तर शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी. एम. जाधव सर यांनी ‘अमृताची गोडी’ हे गीत सादर करून वातावरण अधिक भक्तिमय केले.
प्रमुख पाहुण्या सौ. जया नन्हई मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक व भारतीय परंपरेतील महत्त्व समजावून सांगितले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी. एम. जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना संस्कार, भक्ती आणि वारकरी परंपरेचे महत्त्व पटवून दिले.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय ॲड. वृषालीताई बोंद्रे तसेच आदरणीय राहुल भाऊ बोंद्रे यांनी विद्यार्थ्यांच्या भक्तिमय भक्तिमय सादरीकरणाचे कौतुक करत, भारतीय संस्कृती व परंपरा जपणारे असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले. शेवटी “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम!” या जयघोषात भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. पायी वारीमुळे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला आणि आषाढी एकादशीचा उत्सव संस्मरणीय ठरला.✍️



