रावेर- गारबर्डीत वीज कोसळून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, दोन महिला जखमी…!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील गारबर्डी गावात वीज कोसळून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन महिला जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.गणेश बल्लू भिलाला (वय 35) हे दुपारी साडेतीनच्या सुमारास झाडाला बांधलेली गुरे गोठ्यात आणण्यासाठी शेतात गेले होते. त्याचवेळी अचानक वीज कोसळल्याने त्यांच्या अंगावर वीज पडली. या भीषण दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेत दोन महिला जखमी झाल्याचीही माहिती समोर आली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे गारबर्डी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, महसूल विभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रावेरचे तहसीलदार दिपाली जेधे आणि पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृताच्या नातेवाईकांची भेट घेत सांत्वन केले. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.



