तेल्हारा येथील रा.स्व. संघाचे तथा से.बं. विद्यालयाचे उपाध्यक्ष विलासराव श्रीकृष्ण जोशी अनंतात विलीन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
विजय मनोहरराव घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी
दि.६ एप्रिल |
तेल्हारा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तेल्हारा येथील ज्येष्ठ स्वयंसेवक तथा सेठ बन्सीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी तेल्हाराचे उपाध्यक्ष, तसेच स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ तेल्हाराचे विद्यमान अध्यक्ष विलासराव श्रीकृष्ण जोशी (७५) यांचे शुक्रवार दि. ४ एप्रिल २०२५ दुपारी ३ वाजताच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले. शनिवार दिनांक ५ एप्रिल रोजी त्यांच्या पार्थिवावर तेल्हारा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीत पंचक्रोशीतील अनेक नागरिक उपस्थित होते .
याप्रसंगी केमिस्ट अँड ड्रगिष्ट असोसिएशनच्या वतीने तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,बजरंग दल , विश्व हिंदू परिषद, विद्याभारती , सेठ बन्सीधर दहिगावकर एज्युकेशन सोसायटी तेल्हारा, स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ तेल्हारा , तसेच विविध शिक्षक संघटना , वैद्यकीय संघटना , विविध पत्रकार संघटनांकडुन तसेच वैयक्तिक स्वरूपात अनेक नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या अचानकपणे झालेल्या निधनाने संपूर्ण पंचक्रोशीत शोक कळा पसरलेली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
विद्याभारतीचे ते तेल्हारा येथील सक्रिय कार्यकर्ते होते. डॉक्टर विक्रम विलास जोशी यांचे ते वडील असून विलासराव जोशी यांना समाजकारणाची अत्यंत रुची होती. कदाचित यामुळेच पंचक्रोशीत त्यांचे अनेक चाहते निर्माण झालेत. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि मनमिळाऊ होताच त्याबरोबरच त्यांना माणसं जोडण्याची कला सुद्धा अवगत होती ही विलासरावांची खास गुणवैशिष्ट्ये होती.



