देशसेवेचा गौरव; २४ वर्षांनंतर सैनिक सतिश भुतेकर यांचे सवना येथे भव्य स्वागत….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- शारदा संजय पवार चिखली
चिखली:- २ जून २०२६
सवना येथील भारतीय सैन्य दलात तब्बल २४ वर्षे देशसेवा बजावून आपल्या मूळ गावी परतलेल्या श्री. सतिश मधुकर भुतेकर यांचे आज 2 जून रोजी सवना येथे ग्रामस्थ, मित्रपरिवार व नागरिकांच्या वतीने उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात स्वागत करण्यात आले. देशसेवेसाठी आयुष्याची महत्त्वाची वर्षे अर्पण करणाऱ्या या सुपुत्राच्या सन्मानार्थ गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.व भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना श्री. भुतेकर यांनी देशाच्या संरक्षणासाठी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. सीमावर्ती भागात तसेच विविध महत्त्वाच्या ठिकाणी सेवा देत त्यांनी देशभक्ती, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्यासाठी सवना ग्रामस्थांनी भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन केले.
यावेळी गावातून मिरवणूक काढण्यात आली असून ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत केले. तसेच महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला. स्वागत सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यानंतर प्रीतीभोजनाचे आयोजन करण्यात आले असून गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. देशसेवेतून निवृत्त झालेल्या सैनिकांचा सन्मान करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
श्री. सतिश भुतेकर यांचा जीवनप्रवास हा ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी असून देशसेवा, राष्ट्रनिष्ठा आणि कर्तव्यपरायणतेचे जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या सन्मानार्थ आयोजित हा स्वागत सोहळा सवना गावाच्या इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण ठरत आहे. “देशासाठी २४ वर्षे सेवा बजावलेल्या सुपुत्राचा सवना गावात जल्लोषात सत्कार ग्रामस्थांकडून कृतज्ञतेची अनोखी सलामी”



