देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका डिझेलचा मोठा घोळ?

सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची जिल्हा शल्यचिकित्सकांकडे मागणी; समाधान मिसाळ यांच्या तक्रारीमुळे खळबळ
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा :येथील ग्रामीण रुग्णालयातील शासकीय रुग्णवाहिकेच्या डिझेल वापरामध्ये कथित आर्थिक गैरव्यवहार आणि मोठा घोळ झाला असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, स्वतंत्र आणि सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते समाधान दिलीप मिसाळ यांनी बुलढाणा येथील जिल्हा शल्यचिकित्सकांकडे (CS) एका निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत समाधान मिसाळ यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणाचे जिल्हा शल्यचिकित्सक यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासकीय रुग्णवाहिका ही सर्वसामान्य गरीब आणि गरजू नागरिकांच्या जीविताशी निगडित अत्यंत महत्त्वाची सार्वजनिक सेवा आहे. या सेवेच्या संचालनासाठी शासनाकडून मिळणाऱ्या निधीमध्ये आणि प्रत्येक खर्चामध्ये पूर्ण पारदर्शकता, उत्तरदायित्व व आर्थिक शिस्त असणे अत्यंत आवश्यक आहे.परंतु, देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयातील शासकीय रुग्णवाहिकेच्या नावावर दाखवण्यात आलेल्या डिझेल वापरामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमितता झाल्याचा संशय आहे.
रुग्णवाहिकेच्या फेऱ्या (लाँग बुक) आणि प्रत्यक्षात खरेदी केलेले डिझेल यामध्ये मोठी तफावत असण्याची शक्यता असून, यामध्ये शासकीय निधीचा अपहार झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे.गोरगरीब रुग्णांच्या हक्कावर गदा!ग्रामीण भागातील रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी यासाठी ही रुग्णवाहिका तैनात असते. मात्र, डिझेल वापराच्या नावाखाली जर अशा प्रकारे आर्थिक गैरव्यवहार होत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे रुग्णांच्या जीविताशी खेळ होत असून शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेच्या डिझेल खरेदी, वापर आणि ‘लॉग बुक’ची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी व्हावी.
या कथित घोटाळ्यात सहभागी असलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ प्रशासकीय व फौजदारी गुन्हे दाखल करावेत.करण्यात आलेल्या संपूर्ण चौकशीचा आणि कारवाईचा अहवाल तक्रारकर्त्याला विहित कालावधीत अधिकृतपणे उपलब्ध करून द्यावा.
या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल न घेतल्यास आणि दोषींवर कडक कारवाई न झाल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समाधान मिसाळ यांनी दिला आहे. या निवेदनामुळे आरोग्य वर्तुळात आणि देऊळगाव राजा परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आता जिल्हा शल्यचिकित्सक यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



