तेल्हारा तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तहसीलदार सोनवणे यांचे आवाहन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा ; फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे खरिपातील पिकांसह फळबाग व भाजीपाला आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून त्यांना शासनाकडुन त्वरित आर्थिक मदत मिळावी याकरिता तेल्हारा तहसील चे तहसीलदार समाधानजी सोनवणे यांनी तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना याद्वारे आवाहन केले आहे.
अनेक वेळा अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, अवर्षण, दुष्काळ इ. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान होत असते अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाद्वारे मदत जाहिर केली जाते, बऱ्याचदा आधार प्रमाणीकरण झालेले नसल्यामुळे हि मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी आणखी हवालदिल होतो. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना हि मदत तात्काळ मिळावी यासाठी तहसीलदार सोनवणे साहेब यांनी या बाबीची नोंद घेऊन शेतकऱ्यांना याद्वारे आवाहन केले असुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या गावचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधुन त्यांचेमार्फत पंचनामा व अहवाल तयार करण्यासाठी त्यांना पाहीजे असलेली माहीती जसे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक इ. त्यांना तात्काळ उपलब्ध करुन द्यावी तसेच शासनाकडून विशीष्ट क्रमांक व्हि.के.नं. (V.K NO.) उपलब्ध झाल्यानंतर तात्काळ सेतु केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण ई- के.वाय.सी (e-KYC) करुन घ्यावे. आपले आधार प्रमाणीकरण झाल्या पासून १८० दिवसापर्यंत आपल्या खात्यात पैसे जमा होतील, याबाबत आपण बँकेत जावून अनुदान जमा झाल्याची खात्री करावी तसेच आधार प्रमाणीकरणात काही त्रुटी उद्भवल्यास आपल्या त्रुटींची पूर्तता करणेकामी कागदपत्रांसह तात्काळ तहसिल कार्यालयात संपर्क साधावा. ज्यांच्या बँक खात्याला आधार मैपिंग झालेले असेल त्या बँकखात्यात मदतीचे हे पैसे विना अडथळा थेट जमा होतात त्यामुळे आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर आपल्या नावे असलेले सर्व बँक खाते वेळोवेळी तपासून बघावेत.
तसेच मयत व्यक्तीच्या नावे शेतजमीन असेल तर त्यांच्या कायदेशीर वारसांनी तात्काळ वारस नोंदी होण्याकरिता तलाठी यांचेशी संपर्क साधावा. तसेच मागील वर्षात जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने बाधीत झालेल्या ज्या शेतकऱ्यांनी आपले बैंक खाते व आधार क्रमांक यांचा तपशील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांचेकडे अद्याप पर्यंत दिला नसेल त्यांनीही तातडीने संबंधीत तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांचेकडे जाऊन माहिती द्यावी. ज्या शेतकऱ्यांची शेती सामाईक आहे त्यांनी कोणाच्या खात्यात अनुदान जमा करावे याबाबतचे संमतीपत्र तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांचेकडे जमा करावे.
उपरोक्त नमुद सर्व बाबीचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे जेणेकरुन आपल्या अमुल्य वेळेची बचत होईल व शासकीय मदत आपणास वेळेत प्राप्त होईल याची तेल्हारा तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन तेल्हारा तहसीलचे तहसीलदार मा.समाधानजी सोनवणे यांनी केले आहे.



