तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राईक; केमिकल दुधाचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त, १३ आरोपी जेरबंद

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर एफडीएचा मोठा प्रहार; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने मोठी कारवाई करत केमिकल दुधाचे आंतरजिल्हा रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या धडक कारवाईत १३ आरोपींना अटक करण्यात आली असून, सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचा संशयित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळखोरांविरोधात आक्रमक मोहीम सुरू केली आहे. त्याच मोहिमेचा भाग म्हणून या प्रकरणाचा महिनाभर गोपनीय तपास करण्यात आला. एका दक्ष नागरिकाने दिलेल्या माहितीच्या आधारे एफडीए आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ४ आणि ५ जुलैच्या मध्यरात्री धाड टाकून कारवाई केली.
प्राथमिक तपासानुसार, पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातून रासायनिक द्रव्यांचा वापर करून कृत्रिम दूध तयार करण्याचे रॅकेट चालविले जात होते. या कारवाईत रॅकेटचा मुख्य सूत्रधारही जाळ्यात अडकला आहे. या टोळीचे जाळे पुणे, सोलापूर, जालना, ठाणे, जळगाव आणि धाराशिव जिल्ह्यांपर्यंत पसरले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. काही स्थानिक किराणा दुकानदारांचाही या अवैध व्यवसायात सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
छाप्यादरम्यान दूध तयार करण्यासाठी वापरले जाणारे रासायनिक पदार्थ, उपकरणे आणि इतर साहित्य असा कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या १३ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींवर कठोर कायदेशीर कलमांखाली कारवाई करण्यात येत असून, आवश्यक असल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्याचाही विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राज्यात कार्यरत असलेल्या आणखी दोन अशाच टोळ्यांची माहिती तपास यंत्रणांना मिळाली असून, त्यांच्याविरोधातही लवकरच कारवाई होण्याचे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
दूध हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन आहारातील अत्यावश्यक घटक असून, त्यामध्ये घातक रसायनांची भेसळ करणे हा सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंधित गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे एफडीएने केलेल्या या कारवाईचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, भेसळखोरांविरोधात अशाच कठोर मोहिमा सातत्याने राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



