ट्रक अपघातात चालकाचा मृत्यू; मुक्ताईनगर तालुक्यातील दुर्दैवी घटना

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मालवाहू ट्रकवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार, दि. २७ मे रोजी दुपारी मुक्ताईनगर तालुक्यात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील रहिवासी कैलाससिंग प्रेमसिंग यादव (वय ५०) हे अशोक लेलँड कंपनीचा ट्रक (क्र. RJ-09-GC-6233) घेऊन मलकापूरहून इंदोरकडे जात होते. दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव शिवारात त्यांच्या ट्रकवरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाला.
या भीषण अपघातात चालक कैलाससिंग यादव यांच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत त्यांना ट्रकमधून बाहेर काढले व उपचारासाठी शासकीय रुग्णालय, मुक्ताईनगर येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी गोपालकृष्ण राधेश्याम नायक यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत बोदडे, संदीप धनगर सदर तपास करीत आहे



