अकोलाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

ज्ञानगंगेची गंगोत्री सुरक्षित ठेवली पाहिजे. श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.

ज्ञानगंगेची गंगोत्री सुरक्षित ठेवली पाहिजे. श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ. एखादी संस्था उभारत असतांना उभारणाऱ्या संस्थापक साधूला संसारिका पेक्षा अनंत पटीने ऊर्जा खर्च करावी लागते. संसारिक माणूस जेव्हा स्वतःच्या संसाराचा डोलारा उभारीत असतो, त्यावेळी त्याची शारीरिक व आर्थिक शक्तीच त्या कामी खर्च होऊन, उभारलेल्या सर्व गोष्टी त्याच्या व्यक्तिगत व वंशजांच्या उपयोगाला येत असतात. परंतु एखादा साधू ज्यावेळी समाजहिता करीता अहोरात्र धडपडून एखाद्या संस्थेची उभारणी करतो, त्यावेळी त्याची शारीरिक व आर्थिकदृष्ट्या तर झिंज होतेच , त्याहीपेक्षा त्याच्या व्यक्तिगत साधनेची अर्जित पुण्यसामग्री व आत्मोध्दाराचा बहुमूल्य वेळही त्यात खर्ची पडून, त्याचे आयुष्यात कधीही भरून न निघणारे नुकसान त्यात होत असते. त्यातही उभारलेल्या साधन सामुग्रीत त्याच्या व्यक्तिगत उपभोगाच्या नव्हे तर, केवळ परोपकारार्थ सार्वजनिक उपयोगांच्या वस्तूंचा संचय त्यांनी केला असतांना त्याचा मनसोक्त उपभोग घेणारेच त्या संपत्तीच्या उपभोग शून्य स्वामीवर खूप माया जमविली असे म्हणून अगदी बिनबोभाट व निःसंकोचपणे संग्रहीवृत्तीचा आरोप करून मोकळे असतात. नव्हे नव्हे आपल्या परमार्थिक जीवनाच्या प्राथमिक अवस्थेत त्या साधूनी स्वतःच्या पोटाला फडके बांधून गोळा करून आणलेले दाणे विनामूल्य टिपणारे लाभार्थी पाखरच, पोपटपंची करायला शिकल्यानंतर अनुभवाच्या नाहीतर, केवळ शब्दांच्या पंखावर बसून कल्पनेच्या आकाशात स्वैर उड्डाण करीत देशभर भ्रमंती करणारे संस्थेवर वर्षाकाठी होणाऱ्या कार्यक्रमाकरिता विनामानधन सेवा करावी लागते म्हणून आपल्या शिक्षणाची गंगोत्री असणाऱ्या घरट्याची कृतघ्नपणे वाट मोडीत असतात.वास्तविक पाहता ज्ञान गंगेच्या बारमाही अनस्युत प्रवाहा करिता तिचे उद्गम स्थल असणारी गंगोत्री सुरक्षित असणे गरजेचे असते असे मत भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज यांनी मांडले. ते आज श्रीसंत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे गणेशोत्सवात आयोजित प्रवचन प्रसंगी संस्थेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, संस्थेवर अनेक प्रकारची लोक येत असतात पैकी काही केवळ दर्शनार्थी म्हणून येऊन, स्वतःच्या भ्रमणध्वनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या कोनातून स्वतःचे चित्र व चलचित्र काढून समाज माध्यमांवर टाकण्यातच धन्यता मानत असतात. तसेच काही संस्थेला सहकार्य करण्याऐवजी संस्थेकडूनच सहकार्याची अपेक्षा घेऊन येतात. त्यातच शारीरिक दृष्ट्या समर्थ परंतु आर्थिक दुर्बल आपण आर्थिक मदत करू शकत नाही अशी खंत बोलून दाखवतात तर या उलट संस्थेचे उर्वरित व अर्धवट अवस्थेत असलेले सर्वच कार्य एकट्यातच पूर्ण करू शकण्याची क्षमता असणारे आर्थिक दृष्ट्या संपन्न लोक आमच्या शारीरिक कमजोरीमुळे आम्ही या ठिकाणी सेवा करू शकत नाही असा कांगावा करीत असतात.विशेष म्हणजे त्यांच्या पाया पडण्याकरिता पायीत उभे राहणाऱ्यांच्या भारी भारी पायांबरोबरच त्यांनी सर्वांचे संस्थेच्या उभारणी करीता हात भारी करून, सढळ हाताने हातभार लावला तर तिचा पाया मजबूत होऊन, तिला कळसाप्रत जाण्याकरिता वेळ लागणार नाही. परंतु पाया पडण्यासाठी येऊन नुसते आपले पाय लावणारे हातभार लावण्याची वेळ येताच पाय लावून पडत असतात. वैष्णव या नात्याने विश्वाचे भरण पोषण करणाऱ्या विश्वंभर परमात्म्यावर विसंबून राहत,भविष्याचा कुठलाही विचार न करता आपली व्यक्तिगत साधना व सर्वसाधन सामुग्री समर्पित करून, साधुनी उभारलेल्या संस्थे बरोबरच त्या साधूचे जीवनही सार्वजनिक होऊन, सरते शेवटी ” जनतेचा पैसा आणि बुवाजीचे नाव ” याच भाषेत समाजाकडून त्याच्या समर्पित कार्याची मूल्यांकन केल्या जाते.हिच साधू जीवनाची सर्वात मोठी शोकांतिका आहे असे सखेद मत व्यक्त केल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button