गुन्हेगारीजळगावा जिल्हा

लाकूड वाहतुकीसाठी १० हजारांची लाच मागणाऱ्या वनरक्षकावर एसीबीची कारवाई

जळगाव

लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वन विभागातील कर्मचाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. या प्रकरणी भैय्यासाहेब भीमराव गायकवाड (वय ४३), व्यवसाय – वनरक्षक (आगार रक्षक चालक), नेमणूक – वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, यावल (जि. जळगाव) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे यावल परिसरातील असून ते दोन बोलेरो पिकअप वाहनांद्वारे अंजळे, पाडळसे व आजूबाजूच्या भागात लाकूड वाहतुकीचा व्यवसाय करतात. तक्रारदारांच्या वाहनांद्वारे लाकूड वाहतूक सुरू ठेवण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्याच्या बदल्यात वनरक्षक भैय्यासाहेब गायकवाड यांनी तक्रारदारांकडे १०,००० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

या मागणीबाबत तक्रारदारांनी दि. २० मार्च २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने त्याच दिवशी सापळा कारवाई आयोजित केली. त्यावेळी आरोपी गायकवाड यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आणि तडजोडीअंती ९,००० रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. तथापि, तक्रारदारांकडून पैसे घेण्यासाठी ते आले असता त्यांना संशय आल्याने त्यांनी लाच रक्कम प्रत्यक्ष स्वीकारली नाही. तरीदेखील लाच मागणीचा पुरावा मिळाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध फैजपूर पोलीस स्टेशन (जि. जळगाव) येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान आरोपीच्या अंगझडतीत ९,०४० रुपये रोख रक्कम तसेच दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. त्यामध्ये एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल (अंदाजे किंमत २५ हजार रुपये) व एक आयटेल कंपनीचा मोबाईल (अंदाजे किंमत १ हजार रुपये) यांचा समावेश आहे. मोबाईल हँडसेटची पुढील तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेशमा अवतारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलिस कर्मचारी बाळू मराठे, राकेश दुसाने, सुरेश पाटील आदींचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत. या कारवाईमुळे वन विभागातील लाचखोरीच्या प्रकारांवर अंकुश बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button