बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

श्री गजानन महाराज संस्थानचा ११६ वा पुण्यतिथी उत्सव धार्मिक वातावरणात संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : श्री गजानन महाराज संस्थानतर्फे आयोजित ११६ वा श्री पुण्यतिथी उत्सव १२ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार उत्साहात संपन्न झाला. उत्सव काळात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

उत्सवात दररोज सकाळी ६ ते ६.४५ वाजता काकडा, सकाळी ७.३० ते ९ वाजता गाथा भजन, दुपारी ४ ते ५ वाजता प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६ वाजता हरिपाठ आणि रात्री ८ ते १० वाजता श्रीहरी कीर्तन झाले. यावेळी ह.भ.प. प्रशांत बुवा ताकोते (शिरसोली), ह.भ.प. सुरेश बुवा बाकडे (पोफाळी), ह.भ.प. भरत बुवा चौधरी (म्हैसवाडी), ह.भ.प. अच्युत बुवा दस्तापूरकर (परभणी) आणि ह.भ.प. निवृत्ती बुवा तराळे (व्याळा) यांची कीर्तने झाली.

भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून श्री गणेशयाग व वरुणयागास प्रारंभ झाला. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहुती झाली. तसेच श्रींच्या समाधी सोहळ्यानिमित्त श्रीहरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले.

यंदाच्या पुण्यतिथी उत्सवात श्रींच्या सेवेत ३९७ दिंड्यांनी सहभाग घेतला. नियमांची पूर्तता केलेल्या ८० नवीन दिंड्यांना १० टाळ, १ वीणा, १ मृदंग, श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत आणि श्री माऊली पताका यांचे वितरण करण्यात आले. जुन्या दिंड्यांना भजनी साहित्याच्या दुरुस्तीसाठी नियमानुसार सानुग्रह अंशदान तसेच इतर व्यवस्थेसाठी सहयोग देण्यात आला.

उत्सवानिमित्त आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांसाठी विसावा संकुल येथे भोजनप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच प्रथमोपचार केंद्राची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.

शेगाव येथील मुख्य संस्थानासह पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर आणि गिरडा येथील संस्थानच्या शाखांमध्येही समाधी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या सर्व ठिकाणी मिळून एक लाख दहा हजारांहून अधिक भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. श्रीकृपेने वारकरी व भाविकांची सेवा घडून आल्याचे संस्थानतर्फे कळविण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button