चोरी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार!

मलकापूर दसरखेड MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळ; जिल्हाभर पोलिसांकडून शोधमोहीम
मलकापूर : बुलडाणा जिल्हा पोलीस दलाला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. मलकापूर दसरखेड MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या प्रकरणात पकडण्यात आलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाल्याची माहिती आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दसरखेड MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चार चोरीच्या प्रकरणांशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या एका आरोपीला नागरिकांनी पकडले होते. नागरिकांनी त्याला मारहाण केल्याचीही माहिती समोर आली आहे.
त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. मारहाण झाल्याने त्याला उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र, मध्यरात्रीनंतर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना चकवा देत आरोपी रुग्णालयातून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
पसार झालेल्या आरोपीचे नाव प्रताप बावरी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून, जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याची माहिती आहे. आरोपी कोणत्या दिशेने पसार झाला आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कोणती पावले उचलली जात आहेत, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या घटनेमुळे पोलीस बंदोबस्त आणि आरोपीच्या निगराणीबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, या संदर्भातील अधिकृत माहिती पोलिसांकडून मिळणे बाकी आहे.



