चिखलीत नवदुर्गा महिला नवरात्र मंडळाची भव्य घटस्थापना – महिला सशक्तीकरणाचे जिवंत उदाहरण

चिखली (प्रतिनिधी): अरुणा खंडागळे
चिखली शहरातील साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे नगर, वार्ड क्रमांक ८ येथे नवदुर्गा महिला नवरात्र मंडळाची घटस्थापना मोठ्या उत्साहात व श्रद्धेने पार पडली. विशेष म्हणजे हे मंडळ महिला अध्यक्ष कमलाबाई अशोक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चालवले जात असून, यंदाचे वर्ष हे मंडळाचे तेरावे वर्ष आहे.
संपूर्ण महिला वर्गाने एकत्र येत सुरू केलेले हे मंडळ आज चिखली शहरात एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. “महिलांचं दुःख महिलाच समजू शकते” या संकल्पनेतून, आई देवीची स्थापना एका महिलेच्या हस्ते करण्यात येते, हे या मंडळाचे खास वैशिष्ट्य आहे.
कमलाबाई गायकवाड यांनी तेरा वर्षांपूर्वी जे स्वप्न पाहिले होते, ते आज यशस्वीरीत्या फुलताना दिसत आहे. नवरात्र दरम्यान विविध सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन देखील या मंडळातर्फे करण्यात येते. महिला सशक्तीकरणाचा मूर्त उदाहरण म्हणून नवदुर्गा महिला मंडळाकडे पाहिले जाते.
चिखली शहरातील इतर नवरात्र मंडळांसाठी देखील हे मंडळ प्रेरणादायक ठरत आहे. स्थानिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, शिस्तबद्ध आयोजन आणि सामाजिक भान यामुळे नवदुर्गा महिला नवरात्र मंडळ चिखलीच्या नवरात्र उत्सवात एक विशेष स्थान पटकावत आहे.



