ब्रेकिंग न्यूज: बुलढाणा जिल्हा दुष्काळसदृश जाहीर; सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यांचा समावेश, आमदार मनोज कायंदे यांनी मानले शासनाचे आभार!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
सिंदखेड राजा/देऊळगाव राजा:बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यांसह जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांमध्ये सन २०२६ च्या खरीप हंगामातील पर्जन्यमानातील प्रचंड तूट व अन्य घटकांचा विचार करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी महायुती शासनाचे जाहीर आभार मानले आहेत.
तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
लागू झालेल्या या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची पुढील कायदेशीर कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच, सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती, छायाचित्रे आणि GPS कोऑर्डिनेट्ससह अहवाल शासनाला तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महायुती शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी – आमदार मनोज कायंदे
या निर्णयाचे स्वागत करताना आमदार मनोज कायंदे म्हणाले, “मतदारसंघातील सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात पावसाअभावी शेतकरी अडचणीत होता. शासनाने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केल्यामुळे आता शेतकरी बांधवांना आवश्यक त्या विविध उपाययोजना व शासकीय सवलती लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमचे महायुती शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे.”



