खगोलीय घटनेचे अद्भुत नजारे ! सूर्य ग्रहण , शनी व मंगळ ग्रहांची युती , इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे विशेष दर्शन !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी विजय घोडे
उन्हाळ्याच्या प्रारंभीच रोज नवनवे उच्चांक गाठणारा उष्णतेचा पारा, भरदुपारी वाहणाऱ्या घामाच्या धारा, सावलीचा आधार घेऊन सायंकालीन गार वाऱ्याची वाट या आठवड्यात आपण बघणार आहोतच पण त्याच बरोबर आकाशात आपल्याला अद्भुत नजारेही मनसोक्त या आठवड्यात सर्वांना अनुभवता येणार आहे.
दिवस भराचा थकवा दूर करण्यासाठी सूर्यास्तानंतर काही वेळाने सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू आणि सर्वात लहान असलेला बुध ग्रह पश्चिमेस सज्ज असतील.पहाटे हव्याहव्याशा गारव्यात मंगळ, शनी आणि शूक्र सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजाची
शोभा वाढवताना दिसतील.
फिरत्या चांदणीचा अनोखा नजारा
जगातील सर्वात महागडे अंतराळ अभ्यास व संशोधन केंद्र अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन रात्रीच्या प्रारंभी सलग चार दिवस चमकदार स्वरूपात बहुसंख्य लोकांना सहज आणि नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल.फक्त अक्षवृत्तीय तथा रेखावृत्तीय स्थितीनुसार काहीसा वेळ, दिशा आणि तेजस्वीतेत बदल घडून येईल. महाराष्ट्र भर हा अनोखा आकाश नजारा बघता येईल.
दि.३.बुधवारी रात्री ७-४९ ते ७-५३ या वेळी एक ठळक चांदणी वायव्य ते आग्नेय दिशेला आकाश मध्याजवळून जाईल.
दि.४.ला ७-०१ते ७-०७ या वेळी उत्तरेकडुन पूर्व क्षितिजावर पावणे सहा मिनिटापर्यंत दिसेल.
दि.५.रोजी ७-४९ ते ७-५४ या पाच मिनिटांपर्यत पश्चिमेकडून दक्षिणेकडे जाताना आणि दि.६.शनिवारी पुन्हा ७-०१ ते ७-०७ या वेळेस वायव्य ते आग्नेय बाजूस आकाश मध्याजवळून जाईल.
दि.८ रोजी खग्रास सूर्यग्रहण
निसर्गातील सावल्यांचा खेळ आणि त्यातील खग्रास सूर्यग्रहण म्हणजे आकाश प्रेमींसाठी एक आनंद पर्वणीच. पृथ्वी, चंद्र व सूर्य एका रेषेत आल्याने घडून येणारा हा नजारा दि.८.ला घडून येत आहे.याचा लाभ अमेरिका, कॅनडा भागात खग्रास स्थितीत तर काही ठिकाणी खंडग्रास असेल परंतु आपल्या देशात
हे खग्रास सूर्यग्रहण पाहता येणार नाही. तसेच यानंतर होणारे दि.२ ऑक्टोबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण सुध्दा भारतातून बघता येणार नाही.
शनी मंगळ ग्रह युती एक अप्रतिम अनुभुती
दि.१० रोजी पहाटे पूर्व आकाशात वलयांकित शनी ग्रह आणि लालसर रंगाचा मंगळ ग्रह कुंभ राशीत २० व्या अंशावर एकमेकांच्या अगदी जवळ बघण्याची संधी मात्र आपण सर्वांनी अवश्य अनुभवावी असे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले आहे.



