गणराया, बळीराजाच्या शेतात समृद्धीचा पाऊस पडू दे… आ. श्वेता महाले.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा :चिखली तालुका प्रतिनिधि
अरुणा दत्तात्रय खंडागळे
बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून गणपती बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप..
चिखली शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा बळीराजाच्या दुःखाची किनार होती. कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिके वाळली आहेत. या पार्श्वभूमीवर चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली. यावेळी गणरायाला साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला.
“गणराया, माझ्या बळीराजाचे दुःख सोबत घेऊन जा आणि त्याच्या शेतात सुख-समृद्धीचा पाऊस पडू दे,” अशी भावना आ. श्वेता महाले पाटील यांनी सुखकर्त्या व दुःखहर्ता असणाऱ्या गणेशापुढे व्यक्त केली.
यंदा कमी पावसामुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची पार्श्वभूमी गणेशोत्सवाला होती. कष्टाने उभी केलेली पिके पाण्याअभावी वाळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गणरायाच्या विसर्जनाच्या वेळी बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी आणि त्याच्या शेतात भरपूर पाऊस पडण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
यासोबतच चिखलीतील अनेक गणेश मंडळांनी यावर्षी डीजेमुक्त गणेश विसर्जनाची संकल्पना स्वीकारली. पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूक काढत मंडळांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला.
दरम्यान, कमी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चिखली व बुलढाणा तालुक्याच्या दुष्काळी परिस्थितीबाबत विविध अफवा पसरत आहेत. शेतकरी बांधवांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत निर्णयावर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.
महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. आमदार श्वेता महाले पाटील यांच्याकडूनही मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला जात आहे.
गणरायाला निरोप देताना “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… बळीराजाच्या शेतात सुख-समृद्धीचा पाऊस घेऊन या,” असा जयघोष करण्यात आला.
या प्रसंगी नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, उपनगराध्यक्ष सौ. वैशालीताई कपिल खेडेकर, सुरेश आप्पा खबुतरे, सुहास शेटे, सागर पुरोहित यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि गणेशभक्त उपस्थित होते.



