पत्रकारिता निर्भीड, निष्पक्ष आणि निःपक्षपाती असावी; चिखलीत स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक

पत्रकारिता निर्भीड, निष्पक्ष आणि निःपक्षपाती असावी; चिखलीत स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक
चिखली | प्रतिनिधी – सागर झगरे | दि. ८ ऑगस्ट
समाजातील प्रश्नांना वाचा फोडताना पत्रकारितेने सत्य, कायदा आणि जनहित यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. पत्रकारिता ही निर्भीड, निष्पक्ष आणि निःपक्षपाती असण्यासोबतच सामाजिक सलोखा, कायदा व सुव्यवस्था आणि सर्वांगीण विकासाला हातभार लावणारी असावी, असे प्रतिपादन स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसचे मुख्य संपादक श्री. सचिन झनके यांनी चिखली येथे केले.
चिखली येथील विश्रामगृहावर स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत चिखली तालुक्यासह परिसरातील पत्रकारिता आणि जनहिताच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्य संपादक सचिन झनके यांनी नवीन प्रतिनिधींना प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील पत्रकारितेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना झनके यांनी सांगितले की, पत्रकारिता ही केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसून समाजातील प्रश्न प्रशासन आणि जनतेसमोर तथ्यात्मक पद्धतीने मांडण्याची जबाबदारी आहे. कोणत्याही घटनेचे वृत्तांकन करताना सत्यता पडताळणे, संबंधितांची बाजू जाणून घेणे, अफवा आणि अपप्रचाराला थारा न देणे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल अशा पद्धतीचे वृत्तांकन टाळणे आवश्यक आहे.
समाजातील अन्याय, भ्रष्टाचार, गैरप्रकार, नागरिकांच्या समस्या आणि प्रशासनातील त्रुटी याबाबत निर्भीडपणे आवाज उठविताना कायद्याच्या चौकटीचा आणि पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांचा आदर राखणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकशाही व्यवस्थेत पत्रकारिता ही समाजाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे पत्रकारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता वस्तुनिष्ठ आणि जबाबदार भूमिका बजावावी. समाजहित, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडणे, प्रशासनाला आवश्यक तेथे प्रश्न विचारणे आणि जनतेपर्यंत सत्य माहिती पोहोचविणे हीच पत्रकारितेची खरी दिशा असल्याचे त्यांनी सांगितले.
कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सलोख्याला प्राधान्य
वृत्तांकन करताना संवेदनशील घटनांमध्ये विशेष काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. गुन्हेगारी, सामाजिक वाद, कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न किंवा संवेदनशील प्रकरणांमध्ये अपूर्ण अथवा अप्रमाणित माहिती प्रसारित केल्यास त्याचे सामाजिक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जबाबदार पत्रकारिता, तथ्य पडताळणी आणि कायदेशीर बाबींचे भान प्रत्येक प्रतिनिधीने ठेवणे आवश्यक असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
बैठकीनंतर मुख्य संपादक सचिन झनके यांच्या समवेत उपस्थित प्रतिनिधींनी चिखली येथील आराध्य दैवत श्री रेणुका देवी मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. यावेळी धार्मिक श्रद्धेसोबतच समाजसेवा आणि जनहिताच्या कार्याला नवी ऊर्जा मिळावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी श्री. राजेंद्र मुंढे, श्री. प्रशांत चव्हाण, अरुणाताई खंडागळे, सागर झगरे, श्री. संजय खेडेकर, श्री. गजानन खिल्लारे, श्री. रामदास जाधव यांच्यासह स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसचे प्रतिनिधी उपस्थित होते.
— स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी : सागर झगरे



