जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरराजकीय

विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील सध्या बीजेपीच्या पायवाटेला जाणार का?

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून जागा वाटपाकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. महायुती व आघाडीत प्रत्येकी तीन पक्ष असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. महायुतीत जेथे विद्यमान आमदार आहेत ती जागा त्या पक्षाला सोडणार असे सूत्र ठरले असले तरी याला मुक्ताईनगर विधानसभा अपवाद ठरणार आहे. महायुतीच्या निर्णयानुसार मुक्ताईनगरची जागा भारतीय जनता पक्षाची असून ती जागा लढण्यावर भाजपा ठाम असून त्याला शिंदेसेना देखील अनुकूल असल्याचे वृत्त आहे. ही जागा भाजपाने लढविली तर विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ युतीच्या फॉम्युल्यानुसार भारतीय जनता पक्षाकडे आहेत. 2019 चा अपवाद वगळता गेली अनेक वर्षे येथे भाजपाचा आमदार राहिला आहे. सन 2019 मध्येही भाजपाने निवडणूक लढविली होता मात्र त्यात यश आले नाही. अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील हे यात विजयी झाल्याने त्यांनी शिवसेनेला पाठींबा दिला होता. महायुतीच्या म्हणण्यानुसार आमदार चंद्रकांत पाटील हे अपक्ष लढल्याने ते युतीचे घटक होवू शकत नाही त्यांनी केवळ पाठींबा दिल्याने शिंदेसेनेला जागा सोडणे योग्य होणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून येथे भाजपाचे मोठे नेटवर्क असल्याने आणि युतीत ठरल्याप्रमाणे भाजपचा जागा असल्याने ती भाजपच लढणार आहे. विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आता यक्षप्रश्न उभा ठाकला असून ते महायुतीत काम करणार की अपक्ष लढणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

आमची जागा आम्ही लढणारच ! डॉ. राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर यांची भूमिका

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा पारंपारीक भाजपाचा बालेकिल्ला असून सन 2019 चा अपवाद सोडला तर येथे भाजपाचाच आमदार राहिला आहे. 2019 मध्ये महायुती असतांनाही तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष लढत युतीसमोर पेच निर्माण केला होता. तेव्हाही भाजप पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात होता. मात्र त्यात यश आले नाही; चंद्रकांत पाटील यांनी नंतर शिवसेनेला पाठींबा देत युतीचे घटक झाले असले तरी याचा अर्थ ती जागा अपक्ष उमेदवाराला किंवा शिंदेसेनेला सोडणे असा होत नसल्यानेच भाजप ही जागा लढविण्यावर ठाम असल्याची भूमिका बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी मांडली आहे.

डॉ. राजेंद्र फडके यांनी सांगितले की, मुक्ताईनगर मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. स्व. अशोक फडके, श्री. एकनाथराव खडसे यांनी या मतदारसंघात मोठे जाळे निर्माण करुन पक्ष उभा केला. येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठ्या प्रमाणावर कार्य असून कार्यकर्त्यांची फळी भक्कम आहे. आम्ही पक्षाकडे जागा सोडा अशी मागणी केली नाही तर जागा लढवावी अशी भूमिका मांडली आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला असून लढणे हाच आपला उद्देश आहे. चंद्रकांत पाटील हे अपक्ष असल्याने त्यांना जागा सोडण्याचा प्रश्नच नाही. ते गत काळात शरद पवारांच्या पाठींब्यामुळे विजयी झाले होते अशी आठवणही त्यांनी यावेळी दिली.

शिंदेंनी सांगितले तर घरी बसणार : आमदार पाटील

मुक्ताईनगर मतदारसंघासाठी आपण शिंदेसेनेकडे उमेदवारी मागितली आहे. मात्र भाजप येथे उमेदवार देण्याच्या तयारी आहे असे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन करुन जालना येथे बोलावून घेतले होते, त्यावेळी त्यांनी भाजप-सेनेसाठी काम करा असा आदेश दिला आहे. एकनाथ शिंदेंनी सांगितले तर आपण महायुतीचे प्रचार करुन, ते सांगतील घरी बसा तर घरी बसू असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दै. लोकशाहीशी बोलतांना सांगितले.

आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, महायुतीत वरती काय होत आहे ते कळत नाही मात्र सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करुन चर्चा करण्यासाठी जालना येथे बोलावून घेतले मात्र तेथे प्रचंड पाऊस झाल्याने घाई घाईत  केवळ तीन मिनिटांची भेट झाली त्यात त्यांनी महांयुतीसाठी काम करा असे आदेश दिले आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार आपण महायुतीचा प्रचार करु, ते सांगतील तर घरी बसा तर घरी बसून असेही आ. पाटील यांनी स्पष्ट केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button