सातपुड्यातील जटाशंकर धबधबा फुलला; निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची विक्रमी गर्दी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर | प्रतिनिधी
संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातपुडा पर्वतरांग पुन्हा एकदा हिरवागार साज चढवून खुलली आहे. या पावसामुळे आंबाबरवा अभयारण्य परिसरातील प्रसिद्ध जटाशंकर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून, त्याचे रौद्र आणि मनोहारी रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.सातपुड्याच्या कुशीत वसलेला जटाशंकर धबधबा हा विदर्भातील महत्त्वाच्या नैसर्गिक पर्यटनस्थळांपैकी एक मानला जातो. उंच डोंगरकड्यावरून फेसाळत कोसळणारा जलप्रवाह, घनदाट जंगल आणि रमणीय परिसर पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहे. त्यामुळे दररोज शेकडो पर्यटक येथे भेट देत असून निसर्गसौंदर्याचा आनंद घेत छायाचित्रणाचा मोहही आवरत नाही.धार्मिकदृष्ट्याही जटाशंकरचे विशेष महत्त्व आहे. येथे असलेल्या प्राचीन स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक येत असतात. मात्र पावसाळ्यात धबधब्याचे देखणे रूप आणि निसर्गरम्य वातावरणामुळे हे ठिकाण पर्यटन व वनभ्रमंतीसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.पर्यटकांच्या सोयीसाठी वन समितीने प्रति व्यक्ती २० रुपये प्रवेश शुल्क निश्चित केले असून, वसली येथील प्रवेशद्वारापासून धबधब्यापर्यंत वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर सुमारे दोन किलोमीटरचा पायी प्रवास करून धबधब्यापर्यंत पोहोचावे लागते.दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील दगड शेवाळल्याने अतिशय निसरडे झाले आहेत. त्यामुळे खोल पाण्यात उतरणे, धबधब्याच्या अतिजवळ जाणे तसेच सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घालणे टाळावे, असे आवाहन संबंधित संरक्षण समितीने पर्यटकांना केले आहे. तसेच सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करूनच पर्यटनाचा आनंद घ्यावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



