बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

पांगरी – खल्याळ गव्हाण मार्गावरील वृक्षतोड प्रकरण; 250 हून अधिक झाडे तोडल्याचा संशय ; फक्त 30 टन लाकूड जप्त

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : पांगरी-खल्याळ गव्हाण रस्त्यालगत महावितरणच्या विद्युत खांब उभारणीच्या कामादरम्यान झालेल्या वृक्षतोडीवरून गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनी या प्रकरणात 250 हून अधिक झाडे तोडण्यात आल्याचा आरोप करत सखोल व पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, तोडलेल्या झाडांमध्ये सुमारे 50 लिंब, 12 जांभूळ, 5 बोर, सागवान 5 तसेच काही सागवान व इतर प्रजातींच्या झाडांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही झाडांचे बुंधे जेसीबीच्या सहाय्याने उखडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच जप्त करण्यात आलेले काही लिंब, जांभूळ व बोराचे लाकूड सध्या दिसून येत नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
तक्रारदारांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. संबंधित विभागाने 30 टन लाकूड जप्त केल्याचे सांगितले असताना, 10 ते 15 वर्षे वयाच्या 250 हून अधिक झाडांच्या तुलनेत हे वजन वास्तवाशी सुसंगत आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महावितरण विभागामार्फत विद्युत खांब उभारणीचे काम सुरू असताना संबंधित कंत्राटदाराने आवश्यक परवानगी न घेता करंज, गुलमोहोर, जांभूळ, नीम, शिसू, बोर , सागवान आदी विविध प्रजातींच्या झाडांची तोड केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. याप्रकरणी महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम, 1964 व नियम, 1967 अंतर्गत दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
कारवाईदरम्यान एमएच-28 एबी-7611 क्रमांकाचा लाकूड वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेण्यात आला असून, भारतीय वन अधिनियम, 1927 अंतर्गत वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वनपाल, देऊळगाव राजा करीत आहेत. तसेच 30 टन लाकूड साठा जप्त करण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश गायकवाड यांनी माहिती दिली आहे परंतु वास्तवात दिलेली माहिती आणि वास्तवात असलेली झाडाची संख्या याची तफावत जाणवत आहे यामुळे प्रत्यक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन प्रत्येक झाडाच्या कापलेल्या झाडाच्या बुंध्याची मोजमाप करावी झाडाचे वय किती याची देखील माहिती घ्यावी. तरच अचूक माहिती समोर येईल. जेसीबी द्वारे जप्त केलेल्या झाडांच्या यादीत सागवान, जांभूळ, बोर नसल्याचे सांगण्यात येत आहे, पुरावा नष्ट करण्यासाठी महत्वाच्या काही झाडाचे बुंधे काढून टाकले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे,या घटनेला दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे षडयंत्र रचले जात आहे, जनता , वन्यप्रेमी पुढे निसर्ग वाचवण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकरणात तक्रारदारांनी केलेले आरोप आणि वन विभागाने दिलेली अधिकृत माहिती यामध्ये बऱ्याच बाबींवर तफावत दिसून येत असल्याने, संपूर्ण घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी झाल्यावरच प्रकरणाची वास्तवाची माहिती समोर येईल, पारदर्शक तपासकडे होण्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button