आता बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांकडून प्रमाणपत्र मिळणार !

आ.भावनाताई गवळी पाटील यांची माहिती
ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम नवघरे यांच्या सोबत चर्चा
ग्रामसेवकांचा बहिष्कार मागे
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम/मालेगाव : – कामगारांच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत बांधकाम क्षेत्रात कामगारांना नोंदणी व नूतनीकरणासाठी रहिवासी हद्दीतील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र, हे प्रमाणपत्र देण्यास ग्रामसेवकाकडून नकार देण्यात येत होता. परिणामी जिल्ह्यातील कामगारांच्या नोंदण्या रखडल्या होत्या. त्यामुळे या संदर्भात आ.भावनाताई गवळी पाटील यांनी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम नवघरे यांच्या सोबत चर्चा केली. यावेळी आ.भावनाताई गवळी पाटील यांनी ग्रामसेवकांनी कामगारांना प्रमाणपत्र दिल्यानंतर काही अडचण निर्माण झाल्यास मी ग्रामसेवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही दिली. त्यानंतर जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी कामगार प्रमाणपत्र देण्याच्या कामावर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याचे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम नवघरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार कार्यरत आहेत जे ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा ना करता निरंतर कार्य करत असतात बांधकाम क्षेत्रातील कामगार कमी पगारात काम करत असतात त्यामुळे ते स्वतःच्या तसेच आपल्या कुटुंबाच्या गरज पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी असमर्थ असतात तसेच कार्य करत असताना त्यांना विविध अपघाताला सामोरे जावे लागते त्यामुळे औषध उपचारसाठी त्यांना खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो तसेच अपघातात कामगाराचा मृत्यू देखील होतो त्यामुळे घरातील कर्त्या पुरुषाच्या एकाएकी मृत्यूने कुटुंबाला स्वतःचे जीवन जगण्यासाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने त्रिपक्षीय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या त्रिपक्षीय मंडळाची स्थापना केली गेली. या इमारत व इतर बांधकाम कामगार यांच्यासाठी महायुती सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. त्यासाठी कामगारांच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत बांधकाम क्षेत्रात कामगारांना नोंदणी व नूतनीकरणासाठी रहिवासी हद्दीतील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने 90 दिवस काम केल्या बाबतचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र, काही लाभार्थी खोटी माहिती सांगून प्रमाणपत्र घेत होते. त्यामुळे ग्रामसेवक अडचणीत येत असल्याने हे प्रमाणपत्र देण्यावर बहिष्कार टाकला होता. परिणामी जिल्ह्यातील कामगारांच्या नोंदण्या रखडल्याने जिल्ह्यातील असंख्य कष्टकरी कामगार मंडळाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित राहिले आहेत.
त्यामुळे या संदर्भात आ.भावनाताई गवळी पाटील यांनी मालेगाव येथील विश्राम गृहावर ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम नवघरे यांच्या सोबत चर्चा केली. आत्माराम नवघरे यांच्या कडून ग्रामसेवकांना येणाऱ्या अडचणीवर समजून घेतल्या. ग्रामसेवकांनी कामगारांना प्रमाणपत्र दिल्यानंतर काही अडचण निर्माण झाल्यास मी ग्रामसेवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही दिली. त्यामुळे नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक संघटनेच्या वतीने नवघरे यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे विवेक माने, मारोतराव लादे, शिवसेनेचे प्रदीप पाटील कुटे, मंगेश महाराज, विलास जाधव, संतोष बळी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
कामगारांनी नोंदणी करावी – आ. भावना गवळी पाटील
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर नोंदणीकृत कामगाराला विविध योजनांचा लाभ दिला जातो त्यामुळे बांधकाम कामगाराला विविध फायदे मिळण्यास मदत होते. आता पर्यंत रिसोड व मालेगाव तालुक्यात अत्याल्प नोंदणी झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदणी करावी असे आवाहन शिवसेना पक्ष नेत्या आ. भावना गवळी पाटील यांनी केले आहे.



