अल्पवयीन दुचाकी चालकावर २५ जणांवर चालान

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव शहर वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन दुचाकी चालकांविरोधात विशेष कारवाई करत २५ जणांवर चालान बजावले. ही कारवाई आज सकाळी सुमारे ११.३० वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आली.
कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी संशयित अल्पवयीन दुचाकी चालकांना अडवून त्यांच्या वाहन चालविण्याच्या परवान्याची (ड्रायव्हिंग लायसन्स) तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित चालकांकडे वैध परवाना नसल्याचे निदर्शनास आले.
यानंतर संबंधित अल्पवयीन चालकांच्या पालकांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांच्यासमोर वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले तसेच न्यायालयामार्फत दंड भरण्यासाठी चालान सुपूर्द करण्यात आले.
या मोहिमेदरम्यान एकूण २५ अल्पवयीन दुचाकी चालकांवर चालानाची कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये तसेच वाहतूक नियमांचे पालन करून अपघात टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे



