नर्सरीच्या विद्यार्थ्यांची ॐ अक्षराने सुरूवातगोदावरी स्कूलच्या स्वागत समारंभात चिमुकल्यांची धम्माल; प्राचार्या निलीमा चौधरी यांचे मार्गदर्शन

जळगाव – येथील गोदावरी सीबीएसई इंग्लिश मीडिअम स्कूलतर्फे नर्सरीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्वागत समारंभात चिमुकल्यांनी बम बम बोले, मस्ती मे डोले या गीतावर प्रचंड धम्माल केली. दरम्यान नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी ॐ अक्षराने शैक्षणिक आयुष्याला सुरूवात केली. यावेळी प्राचार्या निलीमा चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
गोदावरी सीबीएसई इंग्लिश स्कुलतर्फे नर्सरीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्राचार्या निलीमा चौधरी आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर शैक्षणिक आयुष्यात पहिले पाऊल ठेवणार्या या चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून ॐ आणि मांगल्याचे प्रतिक असलेले स्वस्तिक हे चिन्ह गिरवून घेण्यात आले. यानंतर वर्गामध्ये शिक्षीका कशा पध्दतीने कविता आणि अभ्यासक्रम घेतात याविषयीचे प्रात्याक्षिक करून दाखविण्यात आले. नर्सरीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी बम बम बोले, मस्ती में डोले या गीतावर नृत्य करीत प्रचंड धम्माल केली.
पालकांना प्राचार्यांनी दिल्या सूचना
स्वागत समारंभात प्राचार्या निलीमा चौधरी यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच दैनंदिन विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम, टीफीन, ड्रेस, होमवर्क याविषयी काही महत्वाच्या सूचना पालकांना दिल्या. शाळेतील वातावरणाविषयीची त्यांनी माहिती दिली. यावेळी पालकांनी विचारलेल्या शंकांचे निरसन शिक्षीकांकडून करण्यात आले. या कार्यक्रमाला शिक्षीका दीपीका सोनार, माधुरी चौधरी, भाविका सिंधी, रेश्मा राजू, शिमनी के., नित्थ्या विजेश, पूजा चंदानी, अश्विनी बोरसे, निकीता अगनानी यांच्यासह किरण चौधरी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.




