अटाळी येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवेवरील दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न ;‘अधिक उपचार, कमी रेफरल’ संकल्पनेवर भर; आरोग्य कर्मचाऱ्यांना विविध विषयांवर प्रशिक्षण

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
बुलढाणा, दि. ८ : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव – कसं काय?’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, अटाळी, ता. खामगाव येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ५ व ६ तसेच ८ व ९ सप्टेंबर २०२६ रोजी दोन बॅचमध्ये झालेल्या या प्रशिक्षणात आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण नागरिकांना त्यांच्या गावाजवळच गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, तसेच ‘अधिक उपचार, कमी रेफरल’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून हा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव, जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा पाटील आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
प्रशिक्षणात डॉ. शैलेश खंडारे, डॉ. जीवन भारती, डॉ. अंजली उजवने, डॉ. पंकज राठोड, डॉ. मंगल राठोड, डॉ. सचिन भांगे, डॉ. मिलिंद वानखेडे, आरोग्य सहाय्यिका कविता खाडे आणि स्वाती शेंद्रे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
माता-बाल व किशोरवयीन आरोग्य, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध, आजारांचे लवकर निदान व उपचार, मानसिक आरोग्य, वृद्धांची आरोग्य सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, आयुष उपचार पद्धती, आरोग्य शिक्षण आणि समुदायस्तरीय आरोग्य व्यवस्थापन आदी विषयांचा प्रशिक्षणात समावेश होता. गर्भवती व प्रसूतीपश्चात मातांची काळजी, नवजात व बाल आरोग्य, संदर्भ सेवा तसेच गावपातळीवरील आरोग्य उपक्रमांचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले.
तांत्रिक सत्रे, गटचर्चा आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण अधिक परिणामकारक करण्यात आले. कार्यशाळेत वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक चव्हाण व डॉ. दिनेश वानखडे, आरोग्य सहाय्यक रवी वाकोडे, रमेश पाघृत व सुनील लोखंडे, आरोग्य सहाय्यिका सुहासिनी इंगळे यांच्यासह समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक-सेविका, एएनएम, एमपीडब्ल्यू, गटप्रवर्तक, आशा समन्वयक आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक, उपचारात्मक आणि पुनर्वसनात्मक आरोग्य सेवांना बळकटी देण्यात येत आहे. लसीकरण, पोषण, स्वच्छता, तंबाखूमुक्ती व व्यसनमुक्ती, असंसर्गजन्य आजारांचे वेळेवर निदान तसेच संसर्गजन्य आजारांपासून बचावाबाबत जनजागृती वाढविण्यावरही भर देण्यात येत आहे.
या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे ज्ञान, कौशल्ये आणि सेवा देण्याची क्षमता अधिक बळकट होऊन नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावरच आवश्यक व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.



