‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत नारायणखेड येथे बालकांच्या आरोग्य व पोषणाबाबत जनजागृती

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
बुलढाणा, दि. ८ : आयुष्यमान आरोग्य मंदिर, डिग्रस बु. अंतर्गत नारायणखेड येथे दि. ७ ऑक्टोबर रोजी नियमित आरोग्य सेवा सत्रासह वेलनेस ॲक्टिव्हिटी घेण्यात आली. आरोग्य सेवा संकल्प अभियान, ‘माझा गाव–आरोग्य संपन्न गाव’ तसेच ‘तिशीचा पल्ला–तपासणी व सल्ला’ अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी अंगणवाडीमध्ये अन्नप्राशन दिन साजरा करण्यात आला. ९ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीच्या अनुषंगाने लाभार्थी बालकांच्या पालकांना सहा महिन्यांनंतर पूरक आहाराची सुरुवात, सकस व संतुलित आहार, स्तनपानाचे महत्त्व, स्वच्छता व हात धुणे, बालकांची वाढ व विकास तसेच नियमित लसीकरणाबाबत आरोग्य शिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले.
नियमित आरोग्य सेवा सत्रात बालकांची आरोग्य तपासणी, वजन व वाढीचे निरीक्षण तसेच लसीकरणाची स्थिती तपासण्यात आली. बालकांना वयानुसार पौष्टिक व विविध आहार देणे, स्वच्छतेची काळजी घेणे आणि आरोग्यविषयक समस्या आढळल्यास तातडीने आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले.
या उपक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. उपक्रमाच्या माध्यमातून बालकांचे पोषण, आरोग्य, वाढ आणि सर्वांगीण विकास याबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.



