रानडुक्कर आडवे आल्यानेदुचाकीचा अपघातः १ ठार १ जखमी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव । रानडुक्कर आडवे आल्याने झालेल्या दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेला जखमी झाल्याची घटना काल २१ मे रोजी रात्री ९.१५ वाजता सुमारास कालखेड रोडवरील हॉटेल गौरव समोर घडली.
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार शहरातील डगडाळी पुरा येथील रहिवासी मो. हमीद शे. आलम (५५) यांचा काल २१ मे रोजी रात्री ९.१५ वाजता सुमारास त्यांच्या होंडा शाईन कंपनीच्या दुचाकीने शेगावकडे येत असताना हॉटेल गौरव समोर रानडुक्कर आडवे आल्याने त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात मो. हमीद यांच्या डोक्याला जबर मार लागला. अपघातानंतर उपचारासाठी त्यांना अॅम्ब्युलन्सने सईबाई मोटे शासकीय उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते. मात्र रूग्णालयात पोहण्यापुर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. तसेच दुचाकीवर मागे बसलेले विश्वास अरबट हे सुध्दा गंभीर जखमी झाले असून त्यांचेवर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेसंदर्भात रूग्णालय प्रशासनाकडून शहर पो.स्टे. ला माहिती दिल्यानंतर शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास पोलिस करित आहेत.



