निर्वाणा फाउंडेशन व एस. एम. कॉलेजमध्ये समाजसेवेसाठी सहयोग; ‘PADA CARE’ उपक्रमातून विद्यार्थ्यांचा वंचित मुलांच्या शिक्षणासाठी सहभाग

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
मुक्ताईनगर | प्रतिनिधी | दि. १५ जुलै २०२६पाड्यावरील तसेच वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या निर्वाणा फाउंडेशन, अंतुर्ली आणि एस. एम. कॉलेज, मुक्ताईनगर यांच्यात बुधवारी (दि. १५) समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी Letter of Collaboration करण्यात आला. या सहयोगामुळे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) मधील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समाजकार्याचा अनुभव मिळणार असून पाड्यावरील मुलांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे.निर्वाणा फाउंडेशनकडून पाड्यावरील व वंचित घटकांतील मुलांना शिक्षण, स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता, शैक्षणिक साहित्य, अभ्यासासाठी मार्गदर्शन तसेच विविध शैक्षणिक अडचणींवर मदत उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्य केले जात आहे. या कार्यात समाजसेवेची आवड असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हा सहयोग करार करण्यात आला.या कराराअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) मधील विद्यार्थी फाउंडेशनच्या “PADA CARE” उपक्रमात स्वयंसेवक म्हणून सहभागी होतील. ते पाड्यावरील मुलांना शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, सामाजिक जनजागृती तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देतील. याशिवाय निर्वाणा फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्वयंसेवा पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.यावेळी निर्वाणा फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष ॲड. प्रफुल किशोर मेढे तसेच ॲड. धीरज पानपाटील यांनी एस. एम. कॉलेजला भेट देऊन महाविद्यालयाच्या प्राचार्य व प्राध्यापक वर्गासमोर सहयोगाचे निवेदन सादर केले.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य आय. डी. पाटील, प्रा. डॉ. पंचशीला वाघमारे, प्रा. डॉ. रमेश शेवाळे, प्रा. के. पी. पाटील, प्रा. देशमुख तसेच महाविद्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.या सहयोगामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना अधिक दृढ होईल, तसेच वंचित व पाड्यावरील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पाठबळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



