बुलढाणा एसटी विभाग राज्यात प्रथम; जयश्रीताई शेळके यांच्याकडून विभाग नियंत्रकांचा सत्कार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली प्रतिनिधी : सलमान पठाण
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागाने संपूर्ण राज्यात एसटीच्या उत्पन्नवाढीत प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी बुलढाणा विभागाच्या विभाग नियंत्रक शुभांगीताई सिरसाट यांची भेट घेऊन त्यांचे तसेच विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले.
यावेळी जयश्रीताई शेळके यांनी शुभांगीताई सिरसाट यांच्या सक्षम नेतृत्वाचे कौतुक करताना, महिला अधिकारी म्हणून शिस्तबद्ध प्रशासन, प्रभावी नियोजन आणि कार्यक्षम नेतृत्वाच्या बळावर उत्कृष्ट कामगिरी करता येते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखविल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छाही दिल्या.
यावेळी बुलढाणा शहरातील रिक्षाचालकांच्या विविध समस्याही विभाग नियंत्रकांसमोर मांडण्यात आल्या. या समस्यांवर सकारात्मक तोडगा निघेल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
या प्रसंगी विजयभाऊ राऊत, सुनिलभाऊ भाग्यवंत, अनिकेतभाऊ गवळी, मुजफ्फर सर यांच्यासह शहरातील अनेक रिक्षाचालक उपस्थित होते.



