दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावरमुक्ताईनगर, बोदवड परिसरातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची घेणार सांत्वनपर भेट
मुक्ताईनगर | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, पावसाचा खंड आणि शेतीसमोरील वाढत्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते दुष्काळग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी आणि त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनियमित पाऊस, पिकांचे नुकसान आणि आर्थिक संकटासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असताना या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शेतीची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणे, या दृष्टीने प्रदेशाध्यक्षांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.असा असेल दौऱ्याचा नियोजित कार्यक्रमप्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे सकाळी १० वाजता मुक्ताईनगर येथील बोदवड रोडवरील उड्डाणपुलाजवळ आगमन होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता बोदवड तालुक्यातील हिंगणे येथे दुष्काळग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील.सकाळी ११.३० वाजता येवती, ता. बोदवड येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्याचे नियोजन आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता जळगाव येथील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहनया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण पूर्व) चे अध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी यांनी काँग्रेस पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी ८.३० वाजता मुक्ताईनगर उड्डाणपुलाजवळील बोदवड रोडवरील डॉ. जगदीश पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे एकत्र जमावे, असे सूचित करण्यात आले आहे. येथून प्रदेशाध्यक्षांच्या नियोजित दौऱ्याला सुरुवात होणार असून, सर्वांनी वेळेचे पालन करून सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याची संधीशेतकऱ्यांच्या अडचणी केवळ कागदोपत्री अहवालांपुरत्या मर्यादित न राहता प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीच्या आधारे समोर येणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत प्रदेशाध्यक्षांचा हा दौरा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना राजकीय आणि सार्वजनिक व्यासपीठावर मांडण्याची संधी ठरू शकतो. आता या पाहणीतून शेतकऱ्यांच्या कोणत्या समस्या पुढे येतात आणि त्यावर काँग्रेस पक्षाकडून कोणती भूमिका मांडली जाते, याकडे जिल्ह्यातील शेतकरी व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



