दिवाळीपूर्वी चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळणार ६४ कोटींची अग्रीम मदत..

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
आवाज न्यायाचा
अरुणा दत्तात्रय खंडागळे
चिखली. तालुका. प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचा शेतकरीहिताचा निर्णय..आमदार श्वेता महाले पाटील यांच्याकडून निर्णयाचे स्वागत!
चिखली : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील चिखली व बुलढाणा या तालुक्याला सुमारे ६४ कोटी रुपये मिळणार असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल त्यामुळे या निर्णयाचे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी स्वागत केले आहे.
दुष्काळ पंचनामे व प्रपत्र ड नुसार चिखली तालुक्यात ८३ हजार ८१४, तर बुलढाणा तालुक्यात ४३ हजार ७१४ शेतकऱ्यांची नोंद आहे. दोन्ही तालुक्यांतील एकूण शेतकरी संख्या १ लाख २७ हजार ५२८ आहे. या संख्येतील प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येकी ५ हजार रुपये मदत मिळाल्यास एकूण रक्कम ६३ कोटी ७६ लाख ४० हजार रुपये होते. यामध्ये चिखली तालुक्यासाठी ४१ कोटी ९० लाख ७० हजार रुपये, तर बुलढाणा तालुक्यासाठी २१ कोटी ८५ लाख ७० हजार रुपये इतकी रक्कम होते. मात्र, प्रत्यक्ष मदतीची रक्कम शासनाच्या निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येवर अवलंबून असेल.
दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळावा, या दृष्टीने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. नियमित दुष्काळी मदतीच्या प्रक्रियेसोबतच शेतकऱ्यांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या भूमिकेचे आमदार श्वेता महाले पाटील यांनी स्वागत केले.
शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव ठेवून त्यांच्या गरजेच्या वेळी मदतीचा हात देणे, ही शासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी अग्रीम आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची शासनाची भूमिका अधोरेखित झाली आहे. आमदार श्वेता महाले पाटील यांनीही या निर्णयाचे स्वागत करत शेतकरीहिताच्या भूमिकेला समर्थन दिले आहे.
शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर पीक नुकसानीच्या भरपाईपासून पाणी, वीज आणि इतर कृषिविषयक प्रश्नांपर्यंत आवश्यक सहकार्य मिळणे गरजेचे आहे. ते आमचे संवेदनशील सरकार शेतकऱ्यांना नियमितपणे देत आहे आणि यापुढेही देत राहील. शासनाच्या योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवणे आणि दुष्काळी परिस्थितीत त्यांना आवश्यक आधार देणे, याला आमचे प्राधान्य असेल, असे आमदार श्वेता महाले पाटील म्हणाल्या…✍️



