देऊळगाव राजात गॅरेजसमोरून दोन लाखांचा मालवाहू ट्रक चोरीला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा :देऊळगाव राजा शहरातील केएमसीआर गॅरेजसमोर उभा असलेला सुमारे दोन लाख रुपये किमतीचा जुना मालवाहू ट्रक अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात १२ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, गुफरान महेमूद पटनी (वय ३०, रा. नॅशनल नगर, जालना) हे वाहनचालक म्हणून काम करतात. त्यांच्या मालकीचा टाटा कंपनीचा २५१५ मॉडेलचा सहाचाकी ओपन बॉडी मालवाहू ट्रक (क्रमांक MH-20-AT-9969) विक्रीच्या व्यवहारानंतर बाबुराव शेषराव वाघमारे (रा. फुलेनगर, भोकरदन, जि. जालना) यांच्या ताब्यात देण्यात आला होता. ट्रकच्या बॉडीची दुरुस्ती करण्यासाठी तो देऊळगाव राजा येथील सय्यद शकील सय्यद शौकत यांच्या केएमसीआर गॅरेजमध्ये लावण्यात आला होता.
१० ऑक्टोबर रोजी सकाळी बाबुराव वाघमारे यांनी फिर्यादीला फोन करून ट्रक गॅरेजमधून नेला आहे का, अशी विचारणा केली. त्यानंतर फिर्यादी देऊळगाव राजा येथे आले. त्यांनी वाघमारे यांच्यासह गॅरेजमधील संबंधित व्यक्तींकडे चौकशी केली असता, ट्रक गॅरेजसमोर उभा असल्याचे आणि तो कोणी नेला याची माहिती नसल्याचे सांगण्यात आले. परिसरात तसेच शहरात शोध घेऊनही ट्रक मिळून आला नाही.
९ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजेपासून १० ऑक्टोबरच्या पहाटे ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने सुमारे दोन लाख रुपये किमतीचा ट्रक चोरून नेल्याची फिर्याद गुफरान पटनी यांनी दिली. त्यावरून देऊळगाव राजा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



