बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

गिरोली खुर्द येथे जुन्या वादातून दोन कुटुंबांत मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : तालुक्यातील गिरोली खुर्द येथे जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये मारहाण झाल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी रात्री घडल्याची नोंद देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, फिर्यादी संदीप रामभाऊ निणे यांच्या कुटुंबाचा त्यांच्या भावाच्या कुटुंबासोबत यापूर्वीपासून वाद होता. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घरासमोरील अंगण झाडण्याच्या कारणावरून फिर्यादींच्या पत्नी आणि भावाच्या पत्नीमध्ये वाद झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास जालना येथे राहणारे नातेवाईक संबंधितांच्या घरी आले. यावेळी जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ व वाद झाल्याचा आरोप आहे.

या वादादरम्यान फिर्यादीला लाकडी काठीने मारहाण करून मनगटाजवळ दुखापत केल्याचे, तसेच मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या त्यांच्या मुलाच्या डोळ्याजवळ काठीने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याशिवाय फिर्यादी व त्यांच्या पत्नीला मारहाण करून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. शेजाऱ्यांनी मध्यस्थी करून वाद सोडविल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

जखमींना उपचारासाठी देऊळगाव राजा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. पुढील उपचारासाठी फिर्यादी व त्यांच्या मुलाला जालना येथे पाठविण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ११८(१), १८९(४), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३२ वाजता एफआयआर नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button