ऐनपूरच्या लेकींची मैदानावर दमदार भरारी!

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयाचे घवघवीत यश; ८ खेळाडूंनी पटकावले प्राविण्य, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा
ऐनपूर, दि. ६ ऑक्टोबर २०२६ तालुका रावेर : प्रतिनिधी – विकास आमोदकर
शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींनी दमदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर येथे दि. ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या मैदानी स्पर्धेत विद्यालयाच्या एकूण १३ खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यापैकी ५ खेळाडूंनी प्रथम, १ खेळाडूने द्वितीय व २ खेळाडूंनी तृतीय क्रमांकाचे प्राविण्य मिळवत एकूण ८ खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले.
१४ वर्षे वयोगटात ऐनपूरचा दबदबा
१४ वर्षे वयोगटात तेजस्विनी विठ्ठल कोळी हिने १०० मीटर धावणे प्रथम, तर सोनाक्षी सोपान धनगर हिने ४०० मीटर धावणे प्रथम क्रमांक पटकावला. गायत्री संदीप धनगर हिने तिहेरी उडीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
तसेच ४×१०० मीटर रिले संघाने प्रथम क्रमांक मिळवत ऐनपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. या संघात तेजस्विनी कोळी, सोनाक्षी धनगर, पूनम महाजन, अनुष्का भिस्ते व प्रणाली तुरकमाने यांचा समावेश होता.
१७ वर्षे वयोगटातही दमदार कामगिरी
१७ वर्षे वयोगटात श्रद्धा कोळी हिने ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. विश्वा पाटील हिने ११० मीटर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
४×१०० मीटर रिले प्रकारात ऐनपूरच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. या संघात अनुष्का भवरे, विश्वा पाटील, रूपाली चौव्हाण, दिव्या जोगी व सोनाली जैतकर यांनी सहभाग घेतला.
१९ वर्षे वयोगटात निकिता कोळीचे सुवर्ण यश
१९ वर्षे वयोगटात निकिता कोळी हिने तिहेरी उडीमध्ये प्रथम क्रमांक मिळवत आपले कौशल्य सिद्ध केले.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यालयाच्या गुणवंत खेळाडूंची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन
खेळाडूंनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भागवत पाटील, चेअरमन श्रीराम पाटील, उपाध्यक्ष रामदास महाजन, सचिव संजय पाटील तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळाने विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. आर. महाजन, उपमुख्याध्यापक जी. आर. महाजन, पर्यवेक्षिका आर. आर. इंगळे, प्रा. जी. यू. कंखरे, प्रा. जे. डी. महंत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही खेळाडूंचे कौतुक करून आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशामागे क्रीडा शिक्षक श्रीकांत महाजन सर, श्रीमती एस. जी. पाटील मॅडम व क्रीडा समितीचे मार्गदर्शन लाभले. ऐनपूरच्या खेळाडूंच्या या दमदार कामगिरीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून “ऐनपूर शाळेचा विजय असो!” असा जल्लोष करण्यात येत आहे.



