आमदार श्वेता महाले यांच्या पुढाकारातून ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत स्वच्छता मोहीम..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा
अरुणा दत्तात्रय खंडागळे
चिखली. ता. प्रतिनिधी
स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त चिखलीचा संकल्प..
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त चिखली नगर परिषदेतर्फे ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात आले. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकारातून श्रमदान करत स्वच्छता अभियान राबवून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यापासून डीपी रोड, बाबू लॉज चौक, राजा टॉवर तसेच रेणुका देवी परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी आमदार श्वेता महाले पाटील यांनी स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे सांगत नागरिकांनी आपल्या शहराच्या स्वच्छतेसाठी ‘सिविक सेन्स’ जपण्याचे आवाहन केले.
कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे आणि नगर परिषदेच्या स्वच्छतेसंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वच्छ चिखली, सुंदर चिखली आणि कचरामुक्त चिखली घडविण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी देशाच्या सुरक्षेसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सीमेवर जागून देशवासीयांच्या सुरक्षिततेसाठी योगदान देणाऱ्या वीर सैनिकांच्या त्यागाला आमदार श्वेता महाले पाटील यांनी अभिवादन केले.शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या नगर परिषदेच्या सफाई कर्मचारी भगिनी-बंधूंचेही यावेळी कौतुक करण्यात आले.
सेवा, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा संकल्प केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवूया, असे आवाहन आमदार श्वेता महाले पाटील यांनी केले.
यावेळी आमदार श्वेता ताई महाले पाटील यांच्यासोबत नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख, उपनगराध्यक्ष वैशालीताई कपिल खेडेकर यांच्यासह सर्व नगरसेवक व मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांच्यासह सर्व अधिकारी व पदाधिकारी हजर होते.



