महामानवाच्या जीवनसंघर्षाची सावली ‘रमाई’…!

‘महामानवाची सावली – मी रमाई’ एकपात्री प्रयोगातून रमाईंच्या त्यागाची हृदयस्पर्शी गाथा उलगडणार…..!
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
कोद्री:- २८ सप्टेंबर २०२६
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनप्रवासात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या माता रमाई आंबेडकर यांच्या त्याग, संघर्ष आणि समर्पणाला उजाळा देणारा ‘महामानवाची सावली – मी रमाई’ हा विशेष एकपात्री प्रयोग कोद्री येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘रमाई’ म्हणजे केवळ बाबासाहेबांच्या जीवनातील एक व्यक्ती नव्हे, तर त्यांच्या संघर्षाच्या काळात दुःख, अडचणी आणि परिस्थितीशी दोन हात करत कुटुंबाचा आधार बनलेली एक त्यागमूर्ती! संसाराच्या असंख्य जबाबदाऱ्या सांभाळताना बाबासाहेबांच्या ध्येयाला बळ देणाऱ्या रमाईंच्या जीवनातील वेदना आणि त्याग या प्रयोगातून प्रभावीपणे मांडण्यात येणार आहेत. दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता विश्वशांती बुद्ध विहार, कोद्री येथे हा एकपात्री प्रयोग सादर होणार आहे. या प्रयोगाचे लेखन अॅड. प्रा. ए. एच. खंडेराव यांनी केले असून, एकपात्री प्रयोग सादरकर्त्या तसेच रमाईच्या वेशभूषेत कु. संबोधी शैलेंद्र रायपुरे सहभागी होणार आहेत. रमाईंच्या त्यागाला मानाचा मुजरा……!
बाबासाहेबांच्या संघर्षमय वाटचालीत रमाईंच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगांची वेदना, त्यांच्या मनातील भावना आणि कुटुंबासाठी केलेला त्याग प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ठरणार आहे. स्वतःच्या सुखाचा त्याग करून महामानवाच्या ध्येयाला साथ देणाऱ्या रमाईंच्या जीवनसंघर्षाची ही कथा प्रत्येकाच्या मनात कृतज्ञतेची भावना जागवणारी ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन तथागत मित्र मंडळ व विशाखा महिला मंडळ, कोद्री यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून रमाईंच्या त्यागाची आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची आठवण नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
“रमाईंच्या त्यागाला मानाचा मुजरा… जय भीम! नमो बुद्धाय!…..✍️



