बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

गणेशोत्सवाचा खर्च टाळून शेतकरी आत्महत्याग्रस्त 4 कुटुंबांना 1 लाखांची मदतश्री चंदनशेष गणेश उत्सव मंडळाचा संवेदनशील पुढाकार; उत्सवापेक्षा माणुसकीला दिले प्राधान्य

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:गजानन तांगडे, खामगांव

खामगाव :- गणरायाच्या आगमनाचा उत्साह, सजावट, रोषणाई, देखावे आणि विविध मनोरंजनाचे कार्यक्रम यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याची परंपरा असताना, खामगाव येथील श्री चंदनशेष गणेश उत्सव मंडळाने यंदा उत्सवाला सामाजिक बांधिलकीची नवी दिशा दिली आहे. गणेशोत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत मंडळाने आपल्या देणगीतून खामगाव तालुक्यातील चार शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 25 हजार रुपये, अशी एकूण 1 लाख रुपयांची आर्थिक मदत करून संकटात सापडलेल्या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्याचा संवेदनशील निर्णय घेतला.गणरायाच्या चरणी फुलांची आरास करण्याबरोबरच दुःखाने कोमेजलेल्या चार कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे. उत्सव हा केवळ रोषणाई, देखावे आणि जल्लोषापुरता मर्यादित न राहता समाजातील गरजू आणि संकटग्रस्त घटकांच्या मदतीसाठी उपयोगी पडू शकतो, हा संदेश श्री चंदनशेष मंडळाने आपल्या कृतीतून दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने ग्रामीण भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे 45 ते 50 दिवस पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनसह विविध पिकांवर संकट कोसळले आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकांची अवस्था बिकट झाली असून उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत आधीच कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला गमावलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे दुःख आणखी तीव्र झाले आहे.या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा आणि उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संवेदना जपण्याचा निर्णय मंडळाने घेतला. गणरायाची सेवा म्हणजे समाजाची सेवाही या भावनेतून मंडळाने आर्थिक मदतीचा हा उपक्रम राबविला.माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते मदत सुपूर्दश्री चंदनशेष गणेश उत्सव मंडळाचे मार्गदर्शक तथा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते पारखेड,भालेगाव,किन्ही महादेव येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. या वेळी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर देण्यात आला.ही मदत केवळ आर्थिक स्वरूपाची नसून, तुम्ही एकटे नाही, समाज तुमच्या पाठीशी आहे, असा आधार देणारी ठरली. संकटाच्या काळात मिळणारी छोटीशी मदतही एखाद्या कुटुंबासाठी मोठा मानसिक आधार ठरू शकते, याची जाणीव मंडळाने ठेवली.सरकारी मदतीसाठीही प्रयत्न करण्याचा शब्दमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ आर्थिक मदत देऊन आपली जबाबदारी संपलेली नाही, अशी भूमिका घेतली आहे. या कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांतून जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच कुटुंबातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा शब्द यावेळी देण्यात आला.शेतकरी आत्महत्येने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला केवळ एकरकमी मदत नव्हे, तर पुढील आयुष्यासाठी आधार आणि स्वावलंबनाची संधी मिळणे गरजेचे आहे. मंडळाने या व्यापक दृष्टिकोनातून पुढाकार घेतल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.उत्सव कमी, माणुसकी मोठी चा संदेश गणेशोत्सवाच्या काळात लाखो रुपयांची रोषणाई, मोठमोठे देखावे आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर खर्च केला जातो. मात्र त्याच वेळी बळीराजा अडचणींच्या गर्तेत असेल, तर त्या कुटुंबाच्या मदतीला धावून जाणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे, हे श्री चंदनशेष गणेश उत्सव मंडळाने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.गणरायाच्या उत्सवाला सामाजिक संवेदनशीलतेची जोड देत चार कुटुंबांना 1 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय हा केवळ आर्थिक मदतीचा उपक्रम नसून माणुसकीचा संदेश देणारा प्रयत्न आहे. उत्सव साजरा करताना समाजातील दुःख विसरू नका, असा भावनिक संदेश या उपक्रमातून पुढे आला आहे. या उपक्रमावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलाससिंग इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज वानखडे, ज्येष्ठ नेते पंजाबराव देशमुख यांच्यासह श्री चंदनशेष गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दिनेश गावंडे, उपाध्यक्ष संजय शर्मा, सचिव हेमंत मुंढे, सहसचिव अश्विन जाधव, कोषाध्यक्ष प्रफुल कुळकर्णी, आखाडा प्रमुख प्रताप कदम, सदस्य सत्तू शर्मा, मीडिया प्रमुख अभय ताडे, सदस्य कौशल ढोले आणि कृष्णा धानोरकार यांची उपस्थिती होती.श्री चंदनशेष गणेश उत्सव मंडळाने गणेशोत्सवाला सामाजिक संवेदनशीलतेची जोड देत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दिलेली ही मदत गणेशोउत्सवातून माणुसकी, आनंदातून सामाजिक जबाबदारी या विचाराला बळ देणारी ठरली आहे. मंडळाच्या या स्तुत्य आणि संवेदनशील उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत असुन
जगाचा पोशिंदा अडचणीत असल्यामुळे यावेळी श्री चंदनशेष गणेशोत्सव मंडळाची गणेश विसर्जन मिरवणुक देखील साधेपणाने निघेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button