देऊळगावमही येथे ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पोलिसांत कायमी मर्ग दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : देऊळगावमही येथील ३८ वर्षीय तरुणाला ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केल्याची घटना रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कलम १९४, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अन्वये कायमी मर्ग क्रमांक ३९ दाखल करण्यात आला आहे.
गणेश संजय शिंगणे (वय ३८, रा. देऊळगावमही, ता. देऊळगाव राजा) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, दि. २० सप्टेंबर रोजी रात्री १०.४५ वाजण्यापूर्वी गणेश शिंगणे यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, देऊळगावमही येथे आणून दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
याबाबत ग्रामीण रुग्णालयाकडून एमएलसी प्राप्त झाल्यानंतर तसेच ऑकरन्स क्रमांक २८३/२०२६ नुसार देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात मर्ग नोंद करण्यात आली. सदर मर्गची नोंद पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ काकड यांनी रात्री ११.३६ वाजता केली.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल कलीम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मृत्यूच्या घटनेबाबत पोलीस तपास करीत आहेत.



