आता कलेक्टर ते तहसीलदार सर्वांना दुपारी नागरिकांसाठी राखीव वेळ ठेवणे बंधनकारक!लोकाभिमुख प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी शासन निर्णय.

आवाज न्यायाचा ,
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी विजय मनोहरराव घोडे अकोला जिल्हा
दि. २० सप्टेंबर २०२६| महसूल विभागाच्या कार्यालयांत अधिकारी भेटत नसल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत शासनाने दुपारी ३ ते ५ हा वेळ नागरिकांच्या भेटीसाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
लोकाभिमुख प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी हा निर्णय असल्याचे समजते.
कोणाला लागू?
जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना प्रत्येक कार्यालयीन दिवशी दुपारी ३ ते ५ हा दोन तासांचा वेळ नागरिकांच्या भेटीसाठी अनिवार्यपणे राखीव ठेवावा लागणार आहे.
निर्णयामागील कारण
नागरिक तक्रारी घेऊन कार्यालयात गेले असता अधिकारी/ कर्मचारी उपस्थित नसल्याच्या तक्रारी शासनाच्या निदर्शनास आल्या. यामुळे लोकाभिमुख प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
अधिकारी गैरहजर असल्यास काय?
अत्यंत तातडीचे शासकीय काम, दौरा किंवा उच्चस्तरीय बैठक असल्यास त्याची पूर्वकल्पना फलकावर प्रसिद्ध करावी लागणार . तसेच नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी पर्यायी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार.
महत्त्वाचे निर्बंध-
या राखीव दुपारी ३ ते ५ वेळेत कोणतीही अंतर्गत बैठक किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स (व्ही.सी )आयोजित करता येणार नाही. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर व अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ही वेळ दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक असेल.
अभ्यागतांच्या भेटी व तक्रारींची नोंद ठेवण्यासाठी मध्यवर्ती नोंदवही ठेवावी लागणार.
अंमलबजावणी
हा शासन निर्णय दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आला असून, महसूल विभागाच्या संबंधित सर्व कार्यालयांत लागू आहे. छोट्या-मोठ्या तक्रारींसाठी नागरिकांना मंत्रालयापर्यंत जाण्याची वेळ येऊ नये, हा यामागील प्रमुख उद्देश आहे.



