संस्कृतीवर्धन हाच उत्सवाचा उद्देश

संस्कृतीवर्धन हाच उत्सवाचा उद्देश .
श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.
अति पुरातन असणाऱ्या भारतीय संस्कृतीमध्ये रुढी , परंपरा व उत्सव यांना अनन्यसाधारण महत्त्व असून ; या त्रयींच्या निर्मिती मागे निर्मात्यांचे पुढील पिढीला संयम , सदाचार व संस्कार देऊन,आत्मोन्नती , समाजोन्नती व राष्ट्रोन्नती व्हावी हे प्रामाणिक तीन उद्देशही होते. म्हणूनच अनादी कालपासून चालत आलेल्या या संस्कृतीने त्या तिन्ही गोष्टींचे अत्यंत जिवापाड प्रेम करून संचलन , संरक्षण आणि संवर्धनही केले. आज मात्र रुढींची ह्या केवळ औपचारिकते पुरत्या शिल्लक राहिल्या असून; परंपरा तर नुसत्या प्रतिष्ठा व प्रदर्शनाकरिता करिता सांभाळल्या जात आहेत. उत्सवामध्ये उत्साह वाढविण्यासाठी धार्मिकतेच्या गोंडस नावाखाली विकृतीची घुसखोरी होते आहे. वास्तविक पाहता उत्सव हे संस्कृती वर्धनाकरिता साजरे केले जावे विकृतीच्या वृद्धीसाठी नाही.
आज मात्र गणेशोत्सव , नवरात्रोत्सव व विविध अवतारादिकांच्या व थोर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी उत्सवाच्या नावाखाली काढल्या जाणाऱ्या शोभायात्रा , लग्न प्रसंगातील वराती व रंगमंचावर सादर केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून शाळा व महाविद्यालयांमध्ये सुद्धा संस्कृतीपेक्षा विकृतीचेच प्रदर्शन होतांना दिसून येते आहे. एवढेच नाही तर , उत्तर हिंदुस्तानातील लोन आपल्याकडे आल्यामुळे सदृश्य कथा सुद्धा या गोष्टीस बरीच भर घालत आहेत. किंबहुना उपरोक्त गोष्टी निर्व्यसनी असणाऱ्या तरुण पिढीला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली व्यसनी बनवून , राजरोसपणे व्यसन करण्याचा अधिकृत परवाना प्राप्त करून देणाऱ्या कार्यशाळाच ठरत आहेत. वास्तविक पाहता उत्सव या शब्दाचा अर्थ उत् = परमात्मा आणि त्सव = प्रगटीकरण अर्थातच परमात्म्याच्या विशेषत्वानी प्रगटीकरणाला उत्सव म्हटल्या जाते. आज मात्र प्रत्येक ठिकाणी उत्सवात व्यसनाधीनतेचा उत येऊन त्या ठिकाणी देवा ऐवजी सर्वत्र दानवच दृष्टीस पडतात. हे संस्कृती रक्षणाच्या दृष्टिकोनातून धोक्याची घंटा आहे.
संस्कृतीच्या नियमानुसार कुठल्याही धार्मिक कार्यामध्ये नाचणे ही पुरातन परंपरा आहे नव्हे नव्हे ते भक्ती क्षेत्राचे अविभाज्य अंग आहे याबाबत दुमत नाही . परंतु सांस्कृतिकदृष्ट्या विचार जर केला तर , वर्तमान आणि प्राचीन परंपरेतील नाचणे हे कृत्य वरपांगी पाहता समान जरी दिसत असले तरी , त्यामधील कृती आणि भावनांमध्ये महदंतर आहे. पूर्वी पारंपारिक सात्विक मंगल वाद्यांच्या सहकार्याने भगवद् नाम चिंतनाची साधना करीत असतांना वासनांचे उपशमन होऊन , प्राप्त झालेल्या सर्वोच्च आनंदाची उर्मी उत्स्फूर्तपणे नाचण्याच्या माध्यमातून अभिव्यक्त होत होती. अर्थातच ते नाचणे हृदयस्थ आनंद मिळाला याची पोचपावती होती. आज मात्र आनंद मिळावा म्हणून मादक द्रव्यांचे सेवन करून, त्याच्या अमलात ( नशेत ) , पाश्चात्य संगीत आणि विकृत वाद्यांच्या कर्णकर्कश आवाजामध्ये काम केंद्रांचे उद्यापन होऊन , हिडीस अंगविक्षेपासह नृत्य प्रकारांच्या माध्यमातून स्त्री- पुरुष एकत्रित येऊन बेधुंद होऊन तो अमल उतरेपर्यंत नाचतांना दिसतात. एकूणच भगवद्भजनाने प्राप्त झालेल्या ब्रम्हानंदाचे आकंठ प्राशन करून , विषयासह देहाचा विसर पडून तल्लीन होऊन नाचणे ही संस्कृती तर , पोप संगीत , विदेशी मादक द्रव्य व तामसी वाद्य यांच्या त्रिवेणी संगमातून विकारी होऊन नाचणे ही विकृती आहे. याला वेळीच आवर घातल्या गेला नाही तर, पुढची पिढी यालाच संस्कृती समजून याचे याहीपेक्षा भयंकर प्रमाणामध्ये दुष्परिणाम लवकरच आपल्याला पाहण्याकरिता मिळतील. म्हणून प्रत्येक कुटुंबप्रमुख , प्रबोधनकार आणि समाज सुधारकांनी भविष्याचा वेध घेत या विकृतीला पायबंध घालण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा संसर्गजन्य रोगांपेक्षाही अतिशय वेगाने वाढणारा हा विकृतीचा भस्मासुर आपल्या सर्वोच्च संस्कृतीला भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही.



