बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अंढेरा परिसरात अवैध रेती उपशावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त, ४ आरोपी ताब्यात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगावराजा:अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत विनापरवाना अवैध गौण खनिज (रेती) चोरी करणाऱ्या तस्करांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ११ सप्टेंबर २०२६ रोजी मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ४ टिप्पर आणि १४ ब्रास रेतीसह एकूण १ कोटी १० लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ४ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. निलेश तांबे सर, बुलढाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. अमोल गायकवाड सर आणि खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. पियुष जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मा. श्री. हेमंत ठाकरे यांच्या आदेशाने एक विशेष पथक अंढेरा परिसरात गस्तीवर होते.

गस्तीदरम्यान अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक केली जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रेतीची वाहतूक करणारे ४ टिप्पर पकडले. या गाड्यांची तपासणी केली असता, त्यामध्ये एकूण १४ ब्रास अवैध रेती मिळून आली. पोलिसांनी रेतीसह चारही टिप्पर जप्त करून पुढील कारवाईसाठी अंढेरा पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) सह गौण खनिज अधिनियम कलम २१(१), २१(२) अन्वये अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई करणारे पोलीस पथक

स्थानिक गुन्हे शाखेची ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) यशोदा कणसे, पोलीस उपनिरीक्षक (PSI) प्रताप बाजड, पोलीस अंमलदार शरद गिरी, जगदेव टेकाळे, पुरुषोत्तम आघाव, युवराज राठोड, विजय वारुळे, अमोल अंभोरे, मंगेश सनगाळे, अमोल वनारे, मनोज खरडे आणि महिला पोलीस अंमलदार पूजा जाधव यांच्या पथकाने केली. पोलीस अधीक्षकांच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button