भरती परीक्षा पारदर्शकतेसाठी अमरावतीत १७ सप्टेंबरला राज्यस्तरीय समितीची संवाद बैठक

विद्यार्थी, पालक व कोचिंग संस्थांच्या प्रतिनिधींना थेट सूचना मांडण्याचे आवाहन
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
बुलढाणा, दि.१२: शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि पेपरफुटीमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीची अमरावती विभागस्तरीय संवाद बैठक येत्या १७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध घटकांनी उपस्थित राहून आपल्या सूचना व तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या विविध भरती प्रक्रियांमध्ये धोरणात्मक बदल करणे, गैरप्रकारांना प्रतिबंध घालणे आणि परीक्षा पद्धत उमेदवाराभिमुख करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. समितीमार्फत राज्यातील सर्व महसुली विभागांत प्रत्यक्ष भेट देऊन स्थानिक घटकांशी संवाद साधण्यात येत आहे.
कार्यक्रमाचा तपशील : दिनांक: १७ सप्टेंबर २०२६, स्थळ: नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती
प्रमुख विषय: परीक्षांमधील गैरप्रकार रोखणे, पद्धतीत सुधारणा आणि पारदर्शकता आणणे.
परीक्षा प्रणालीतील त्रुटी दूर करून ती अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हातील जास्तीत जास्त प्रतिनिधींनी व विद्यार्थ्यांनी या बैठकीस उपस्थित राहून आपले मत नोंदवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



