भरोसा येथे शेतकरी नेते शरद जोशी यांची ९२ वी जयंती उत्साहात साजरी

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस, दै. आवाज न्यायाचा
चिखली तालुका प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा शेतकरी नेते शरद जोशी यांची ९२ वी जयंती भरोसा येथे आज सकाळी ८ वाजता महादेव मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमाला गावातील शेकडो महिला-पुरुष शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
यावेळी शरद जोशी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या शेतकरी हिताच्या विचारांना उजाळा देण्यात आला. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, शेतीमालाला रास्त भाव मिळावा, शेतकरी स्वावलंबी व्हावा आणि शेतीला आर्थिकदृष्ट्या सक्षम स्थान मिळावे, यासाठी जोशी यांनी उभारलेल्या लढ्याचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान “शरद जोशी अमर रहे!” आणि “शेतकरी संघटनेचा विजय असो!” अशा घोषणांनी संपूर्ण भरोसा गाव दुमदुमून गेले.
८०च्या दशकापासून भरोसा गाव शरद जोशींच्या विचारांसोबत
भरोसा गावाचा शरद जोशी यांच्या विचारांशी १९८०च्या दशकापासून जवळचा संबंध आहे. शेतकरी संघटनेच्या विविध आंदोलनांमध्ये गावातील तरुण, महिला आणि पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतीमालाला रास्त भाव आणि शेतकऱ्यांना खुल्या बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळावे, यासाठी देशभरात झालेल्या अनेक आंदोलनांमध्ये भरोसा येथील शेतकरी सहभागी झाले होते.
“भिक नको, घामाचे दाम हवे!” हा नारा देत शरद जोशी यांनी शेतकऱ्यांमध्ये आत्मसन्मान आणि आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची जाणीव निर्माण केली. त्यामुळे आजही भरोसा गावात त्यांच्या विचारांबद्दल विशेष आदर असल्याचे दिसून येते.
नेत्याच्या निधनानंतरही विचारांची मशाल कायम
१२ डिसेंबर २०१५ रोजी शरद जोशी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर शेतकरी चळवळीची धार काही प्रमाणात मंदावली असली, तरी त्यांच्या विचारांची मशाल मात्र शेतकऱ्यांनी जपली आहे. भरोसा येथील शेतकरी दरवर्षी त्यांच्या जयंतीचे आयोजन करून आपल्या लाडक्या शेतकरी नेत्याला अभिवादन करतात.
यावेळीही मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र येत शरद जोशी यांच्या विचारांना अभिवादन करत शेतकरी चळवळीला नव्या उमेदीने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला



