श्री व्यंकटेश महाविद्यालयात वाणिज्य व अर्थशास्त्र अभ्यास मंडळ उद्घाटन संपन्न

अंकिता सोरठिया यांनी दिला ब्युटी इंडस्ट्रीतील रोजगाराचा कानमंत्र
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगावराजा :स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयात वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने वाणिज्य व अर्थशास्त्र अभ्यास मंडळ उद्घाटन समारोह आणि उद्योजकता विकास मार्गदर्शन उपक्रम संपन्न झाला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन प्रतिनिधी राणीसाहेब सौ. छायाराजे विजयासिंह जाधव यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे होते. अभ्यास मंडळ उद्घाटक म्हणूनमेहकर येथील एमईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय दांदडे उपस्थित होते. संचालिका अंकिता सोरठिया ब्युटी पार्लर क्षेत्रातील संधीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात अर्थसंवाद आणि वाणिज्य जगत भित्तीपत्रकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. प्राचार्य डॉ. संजय दांदडे यांचा प्राचार्य पदी नियुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला तसेच राणीसाहेब सौ. छायाराजे जाधव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
उद्घाटकीय मनोगत करताना प्राचार्य डॉ. संजय दांदडे यांनी विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र आणि वाणिज्य क्षेत्रातील रोजगार तसेच स्वयं रोजगाराबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी ज्ञानग्रहण ही विद्यार्थ्याची प्राथमिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले. अंकिता सोरठिया यांनी विद्यार्थिनींना स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. भक्ती लटके हिने केले तर कु. भाग्यश्री बन्सीले हिने आभार मानले. अतिथी परिचय डॉ. ज्योती ढोकले यांनी करून दिला. प्रास्ताविक वाणिज्य विभागप्रमुख डॉ. नरेंद्र शेगोकार यांनी केले. अभ्यास मंडळ कार्यकारिणीची घोषणा डॉ. विनोद बन्सीले यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. योगेश आठवे, प्रा. अशोक सवडे, प्रा. मधुकर जाधव, प्रा. मंदार जोशी यांनी देखील परिश्रम घेतले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



