शिंगणे थांबणार, फुंडकरांना संधी? जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा सस्पेन्स; गायकवाड उपाध्यक्ष?

शिंगणे यांनी मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारून नव्या नेतृत्वाला संधी द्यावी; ९ सप्टेंबरच्या निवडीकडे सहकार क्षेत्राचे लक्ष
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
बुलढाणा : बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया ९ सप्टेंबरला होत असून, अध्यक्षपदासाठी मंत्री आकाश फुंडकर यांच्या नावाची चर्चा असल्याचे बोलले जात आहे. तर उपाध्यक्षपदासाठी आमदार संजय गायकवाड यांच्या नावाची चर्चा असल्याने जिल्हा बँकेच्या नव्या नेतृत्वाबाबत उत्सुकता वाढली आहे.
२१ पैकी १९ संचालकांचे संख्याबळ असलेल्या सहकार पॅनेलसमोर आता अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा महत्त्वाचा टप्पा आहे. निवडणुकीत स्पष्ट वर्चस्व मिळवल्यानंतर बँकेची धुरा कोणाकडे सोपवायची, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र, अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी कोणाचेही नाव अधिकृतपणे निश्चित झाल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा जिल्हा बँकेच्या सहकार क्षेत्रातील दीर्घ अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी बँकेचे अध्यक्षपद भूषविले असून, बँकेच्या राजकारणात त्यांची दीर्घकाळ महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे त्यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत असले तरी, आता त्यांनी स्वतः अध्यक्षपद स्वीकारण्याऐवजी मार्गदर्शकाची भूमिका घेत नव्या नेतृत्वाला संधी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शिंगणे यांनी एखाद्या नव्या व्यक्तीला अध्यक्षपदाची संधी दिल्यास त्या नेतृत्वाला स्वतःची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि नेतृत्वक्षमता सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. अनुभवी नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली नव्या व्यक्तीने बँकेच्या कारभारात नवी कार्यपद्धती, प्रभावी नियोजन आणि सक्षम व्यवस्थापनाचा प्रयोग केल्यास जिल्हा बँक भविष्यात आणखी मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी संचालक मंडळात १७ नवीन संचालक निवडून आले आहेत. त्यामुळे नव्या नेतृत्वाला जबाबदारी देण्याची पार्श्वभूमीही तयार झाली आहे. अनुभव आणि नव्या नेतृत्वाचा समन्वय साधून बँकेला पुढील काळात अधिक सक्षम करण्याची संधी या निवडीतून मिळू शकते, अशी चर्चा सहकार क्षेत्रात आहे.
अध्यक्षपदासाठी आकाश फुंडकर यांच्या नावाची चर्चा असल्याने ही शक्यता विशेष लक्षवेधी ठरत आहे. फुंडकर हे सहकार पॅनेलमधील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहेत. त्याचवेळी उपाध्यक्षपदासाठी संजय गायकवाड यांच्या नावाची चर्चा असल्याने अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत राजकीय समतोल साधण्याचे आव्हानही पॅनेलसमोर राहणार आहे.
त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या राजकारणात ‘शिंगणे थांबणार की पुन्हा नेतृत्व स्वीकारणार?’ आणि ‘फुंडकरांना अध्यक्षपदाची संधी मिळणार का?’ यासोबतच ‘गायकवाड उपाध्यक्ष होणार का?’ हे प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
९ सप्टेंबरला होणाऱ्या प्रत्यक्ष निवडीत या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळणार असून, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची अधिकृत निवड त्यानंतर स्पष्ट होणार आहे.



